नागपूर, दि.28: भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उभा आहे, त्या समर्थ भारताची पायाभरणी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. “राष्ट्रपुरूष अटल” या महानाट्याच्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विशेष प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, अटलजींच्या जीभेवर साक्षात सरस्वती वास करत होती.त्यांचा प्रत्येक शब्द ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा होता. या महानाट्याच्या निमित्ताने अटलजींच्या गुणांची पुन्हा एकदा उजळणी करायला मिळेल, हे महद्भाग्य आहे. त्यांच्या सूर्यापेक्षा तेजस्वी आयुष्यावर थोडा प्रकाश या महानाट्यामुळे पडेल. त्यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे “कदम मिलाकर चलना होगा” हे तत्व घेऊन शक्तीशाली भारतमातेसाठी सर्वांनी वाटचाल करावी ही प्रेरणा या महानाट्याने मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अटलजींचा प्रभाव विद्यार्थी दशेतच अनुभवला होता. 13 दिवसांचे अटलजींचे सरकार ज्या दिवशी पडले त्याच दिवशी जम्मू इथल्या अभाविपच्या काश्मिर विषयक कार्यक्रमात जणू स्वतः च्या सरकारविषयक काही घडतच नाहीये अशा रितीने ते स्थितप्रज्ञतेने सहभागी झाले होते आणि काश्मिरविषयक मार्गदर्शन करणारे भाषण त्यांनी केले होते, अशी आठवण श्री. पाटील यांनी सांगितली. अटलजींची ती स्थितप्रज्ञता, ते अध्यात्मिक वागणर खूप खोलवर प्रभाव करून गेले असे ते पुढे म्हणाले.
“हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय” अशी सिंहगर्जना वयाच्या आठव्या वर्षी करणाऱ्या आणि भारताला अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील “राष्ट्रपुरूष अटल” या महानाट्याला काल नागपुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने येथील वसंतराव देशपांडे सभागृहात या महानाट्याचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंचावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रवीण दरेकर, यांच्यासह सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, उप सचिव विलास थोरात हे उपस्थित होते. तर निवेदऩ श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.शक्ती ठाकुर यांनी निर्माण केलेले हे महानाट्य प्रियंका ठाकुर यांनी दिग्दर्शित केले आहे.