भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांस तात्काळ निधी दिला जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. २८ : “रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
“वरळी येथील कामगार रुग्णालयात अतिदक्षता व सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी ईएसआयसीला निर्देश दिले जातील. रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
“आर.एन. कूपर रुग्णालयात नेफ्रोलॉजी, कॅथलिक युनिट उभारण्याच्या परवानगीसह विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुविधा देण्यासाठी संबधितांना तात्काळ निर्देश दिले जातील”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
यासंदर्भात विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, विलास पोतनीस, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता.
0000
संजय ओरके/विसंअ
अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार – मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती
नागपूर, दि. 28 : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते.
मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरसाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
0000
धोंडिराम अर्जुन/ससं
इलेक्ट्रिक एसटी बसकरिता १७० ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाकरिता नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सन २०१६-१७ पासून २९२१-२२ या कालावधीत एसटी महामंडळाने ३२३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर ते २६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने २ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. 700 बसेस मध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निम-आरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेस पैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडी बिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.
ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एस. टी.बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमंडळामार्फत दूर केल्या जातील, असेही मंत्री श्री.देसाई यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य राजेश राठोड, अभिजित वंजारी, जयंत आजगावकर यांनी प्रश्न विचारला होता
000
मनीषा पिंगळे/विसंअ
रामटेकळी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण – मंत्री डॉ. तानाजी सावंत
नागपूर, दि. 28 : “रामटेकळी (ता. मानवत, जि. परभणी) येथील कोल्हापूरी बंधारा क्र.३ चे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. जून २०२३ मध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येईल”, अशी माहिती मंत्री डॅा. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी करण्याबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात एकनाथ खडसे, अनिल परब आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री डॅा.तानाजी सावंत म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना काळात काम थांबले होते. कंत्राटदाराने उपविभागाकडून कामाची आखणी करून न घेता परस्पर दुसऱ्या ठिकाणी काम सुरु केले. ही बाब निदर्शनास येताच काम थांबविण्यात आले. याबाबत कंत्राटदार आणि उप अभियंत्यांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाचा निधी वाया गेला नसून शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. तथापि या कामातील हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कार्रवाई केली जाईल”, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले.
०००००
पवन राठोड/ससं
अकोल्यातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. २८ : “अमृत अभियानांतर्गत अकोला शहरात जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरिता नेमलेल्या एपी ॲण्ड जीपी एजन्सीने केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल”, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
ही जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण राहिल्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, “अकोला शहरातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. या कामांच्या बिलांमध्ये तफावत दिसून येत आहे. कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. या योजनेच्या कामात एका टाकीविषयी स्थानिक वाद आहे. हा वाद सामंजस्याने सोडवून काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अमृत योजना टप्पा २ अंतर्गत कामाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल”, असेही मंत्री सामंत यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
००००
मनिषा पिंगळे/विसंअ