नंदुरबार: दिनांक १९ डिसेंबर २०२२ (जिमाका वृत्तसेवा): तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती १०० टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९ गावांच्या पणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश गावित, मंगलसिंग भिल, सरपंच शोभाताई पाटील (भालेर), रोहिणी पाटील (खोंडामळी),भागाबाई कोटवाय (धामडोद), सिताबाई भिल (भागसरी), अधिकारी, पदाधिकारी व पंचक्रोशीतील खोंडामळी, धामडोद, बामडोद, शिंदगव्हाण, विखरण, जुनमोहिदा, भालेर, भागसरी, कलमाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे आपापल्या क्षेत्रात एक ध्येय असते, त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्नांची शिकस्त करत असते. त्याप्रमाणे तापी नदीचे पाणी परिसरातील नंदुरबार व शहादा तालुक्यातील शेतांमध्ये पोहोचवून १०० टक्के शेती सिंचनाखाली आणायचे आमचे ध्येय असून ते पूर्णत्वास येण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील आहोत.
ते पुढे म्हणाले, वावर-शिवार, घर आणि घरातल्या प्रत्येकासाठी पाणी देण्यासाठी आपण कटिबद्ध असून जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाण्याचे नियोजन करून येणाऱ्या ३० वर्षांना पुरेल एवढे पेयजल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल १०० टक्के शासन भरणार असल्याने विद्युत पुरवठ्याअभावी योजना थांबणार नाही, अशी ही शाश्वत स्वरूपाची जलयोजना असल्याचेही यावेळी यावेळी सांगून लवकरच पक्क्या रस्त्यांच्या निर्मितीतून,गटारींच्या बांधकामातून गावातील वाड्या-वस्त्या चकाकणार असल्याचीही ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.
शाश्वत सिंचनाच्या उपाययोजना होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध जलस्रोतांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी शेती, फलोत्पादनाच्या कृषी व आदिवासी विकास विभागाच्या शेडनेट, पॉलीहाऊस, ड्रीप योजना अर्थसहाय्याच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करताना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या ९५ टक्के व लाभार्थ्यांच्या ५ टक्के सहभागातून जिल्ह्यात २८६ शेडनेट धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूरसह नंदुरबार जिल्ह्यात मिळवून दिले . त्यामुळे अवघ्या १० गुंठे जमीनीवर सरासरी ₹ ७ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांनी काढल्याचे सांगताना नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देवून कमी वेळेत, कमी खर्चात, कमी मेहनतीत उत्पन्न तिप्पट ते चारपट वाढले पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य सेवांचे करणार बळकटीकरण
जिल्ह्यातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जाणार असून मोठ्या गावांमध्ये आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारून आवश्यकतेनुसार तेथे सेवा वाढविल्या जातील. आवश्यक तेथे अंगणवाड्या उभारून शाळेच्या खोल्या, विद्युतीकरण करणार असल्याचेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशनची अंमलबजावणी, त्याचे फायदे व व्याप्ती विषद करताना गावातील प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी शुद्ध पाणी देण्याचा मनोदय व्यक्त केला.
शाश्वत स्वरूपाची जलयोजना – खासदार डॉ. हिना गावित
खोंडामळी व पंचक्रोशीतील गावांची आजची लोकसंख्या ही १६ हजार १४४ इतकी असून येणाऱ्या ३० वर्षात ही लोकसंख्या २३ हजार इतकी असेल, असे गृहित धरून जलजीवन मिशनच्या माध्यमातून सतत पाणीपुरवठ्याची शाश्वत स्वरूपाची योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला गृहित धरून साकारणाऱ्या या योजनेत सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी गटारींच्या निर्मितीचीही योजना केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावागावत राबवली जाईल. त्यासाठी ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांना थेट ग्रामपंचायतींना निधी वितरित केला जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार लोकसंख्येच्या गावांचा आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे मंजूरीला पाठवला जाईल. ज्या गावांची लोकसंख्या ५ हजारापेक्षा कमी असेल त्यांना केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून असलेल्या निधीद्वारे एकत्रित आराखडा करून गटारांच्या निर्मितीचे काम घेण्याचा संकल्प आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व गावांच्या यात समावेश कसा करता येईल, यासाठी प्रयत्न असल्याचे सांगून केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठीच्या विविध कामांसाठी निधी वितरित केला जात असल्याची माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी बोलताना दिली.
या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे झाले भूमिपूजन
यावेळी खोंडामळी, धामडोद, बामडोद, शिंदगव्हाण, विखरण, जुनमोहिदा, भालेर, भागसरी, कलमाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन करण्यात आले.