औरंगाबाद, दि.11 (जिमाका) :- आज नागपूर येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज येथे लोकार्पण तथा उद्घाटन कार्यक्रमाचे दुरदृश्यप्रणाली द्वारे प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले होते.
या कार्यक्रमास केद्रींय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार व पणन मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार,आमदार सर्वश्री हरीभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाठ, प्रशांत बंब जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता बापुराव साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते.
याठिकाणी माळीवाडा इंटरचेंज महामार्गावार नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्साह पूर्ण वातावरणात औरंगाबाद करांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा एक साक्षीदार म्हणून आनंद घेतला. सुर्यभान बाबुराव रावते पाटील या शेतकरी बांधवानी समृद्धी महामार्गामूळे आमच्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळणार आहे. तसेच आमच्या जमिनीला योग्य भाव मिळाल्याने चांगल्या घरात राहत आहोत, यामुळे आमचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सुखी झाले आहे. अशी प्रतिक्रिया समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रम नंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच गोपीनाथ् मालकर रा. वडाचीवाडी (शहापूर बंजर) यांनी आमचा शेतमाल नागपूर आणि मुंबई या दोनही महानगरात कमी वेळेत पोहचणार यामुळे योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.