मुंबई, दि. १० : आपल्या जीवनाला वैचारिक दिशा असेल तर ते तत्त्वज्ञान घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. सुदृढ आणि सुसंस्कृत समाज घडण्यासाठी आपल्या जीवनात ग्रंथांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, तहसीलदार श्री. वसावे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. ग्रंथोत्सव 2022 देखील या उपक्रमाचाच एक भाग आहे. ग्रंथ उत्सवाच्या माध्यमातून ग्रंथ प्रेमींनी पुस्तक खरेदी करावीत. एक चांगला समाज घडण्यासाठी चांगले विचार लोकांनी वाचले पाहिजेत आणि यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. वाचनाने आपल्याला प्रेरणा मिळते. चांगल्या वाचनातून आपल्याला जीवन जगण्याची दिशा मिळते. आपले वैचारिक मतभेद असतील तरी आपली भूमिका विचारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. आपल्या लिखाणातून कोणाचा अपमान होऊ नये असे देखील लिखाण असावे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी मांडले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जगाला शांततेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपली जात, भाषा, धर्म यापेक्षा देश मोठा असल्याची शिकवण दिली. अण्णा भाऊ साठे यांच्यासारखा महान लेखक या मातीत घडला. त्यांनी कोणत्याही शाळेत न जाता साहित्यातील दिलेले योगदान हे नक्कीच मोलाचे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे मोठ्या विचारवंतांचे विचार आपण वाचले पाहिजेत. त्यांनी दिलेल्या शिकवणी अंगीकारल्या पाहिजेत. आज आपल्याकडे ग्रंथोत्सवच्या माध्यमातून जे प्रकाशक उपस्थित आहेत त्यांच्याकडील पुस्तके खरेदी करून नक्की वाचन करावेत, असे आवाहनही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी केले.
या ग्रंथोत्सवात ‘आनंदयात्रा’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. दीपाली केळकर यांचा हास्य संजीवनी, तर उद्योजकता आणि स्टार्टअप विकास या विषयावर प्रा. एस.आर.कस्तुरे यांचे व्याख्यान झाले. महेश केळुसकर यांचे 21 भारतीय भाषांतील अनुवादित कवितांचे सादरीकरण पार पडले. यामध्ये डॉ.विजय चोरमारे, सतीश सोळांकूरकर, प्रतिभा सराफ, प्रज्ञा दर्भे यांचा सहभाग होता.