• Sat. Nov 16th, 2024

    विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    ByMH LIVE NEWS

    Dec 7, 2022
    विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    मुंबई, दि. 7 – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 868 कोटी 64 लाख रुपयांची नुकसानभरपाई रकमेचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असून प्रलंबित 364 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री  श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

    स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसान भरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. आतापर्यंत एकूण 39 लाख 88 हजार 380 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 868 कोटी 64 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करावी. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी विमा कंपन्यांना दिले.

    मंत्रालयात यासंदर्भात भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    000

    दीपक चव्हाण/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed