मुंबई, दि. ७ : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, उद्या दि. ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या एकाचवेळी १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. जी २० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका ह्या मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडींग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृष्यस्वरूपात बदल दिसावे यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी. महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी, महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महानगरात ज्याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी सुरू आहे त्या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी. शहरातील स्कायवॉकवर रोषणाई करावी. त्याचबरोबर स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची निरंतर स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या मुंबईत राबवाव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अंमलात आणावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नुतनीकरण (रिसर्फेसिंग), पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटींग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी देण्यात आली.
००००