• Sat. Sep 21st, 2024

राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Dec 4, 2022
राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असेल, नागपूर ते शिर्डी 520 किमीचा मार्ग सुरू होईल. नागरिकांची या महामार्गामुळे मोठी सोय होईल. नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. देशातला व राज्यातला हा गेमचेंजर प्रकल्प असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला असल्याचे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासमवेत या महामार्गाची उद्घाटनापूर्वी पाहणी करण्याचा विशेष आनंद आहे. समृद्धी महामार्गामुळे 16 ते 18 तासांचे अंतर सहा ते सात तासांवर येणार आहे. मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील, उद्योगधंदे वाढतील. शेतकऱ्यांनाही दळणवळणास मदत होईल. अनेक जिल्हे या महामार्गामुळे जोडले जातील. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच मार्गावरुन प्रवास करण्याचा आज वेगळा आनंद आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा विशेष आनंद आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प या भागाला समुद्धी देणारा आहे. आमच्या सरकारचा सर्वानाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई-पुणे हा देशातील पहिला अॅक्सेस कंट्रोल असलेला महामार्ग आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला असल्याचे मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed