• Sat. Sep 21st, 2024

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून धारणी, हरिसाल येथील रुग्णालयातील सुविधांची तपासणी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 3, 2022
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून धारणी, हरिसाल येथील रुग्णालयातील सुविधांची तपासणी – महासंवाद

अमरावती, दि. 3 : नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे रुग्णालयात सुविधा अद्ययावत व सेवा सुरळीत असाव्यात. जिथे यंत्रणा नादुरुस्त किंवा त्रुटी असतील तर त्या तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या एएनएम कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी यावेळी सकारात्मकता दर्शविली.

आरोग्य मंत्र्यांनी आज सकाळी धारणी उपजिल्हा रुग्णालयाला, तसेच हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  भेट देऊन प्रत्येक कक्ष, यंत्र व सुविधांची तपासणी केली. आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक डॉ  नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंग तुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मंगेश मेंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस वानखडे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विविध कक्षातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून सुविधा योग्यरीत्या मिळतात किंवा कसे, याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्याशीही संवाद साधला. औषध वितरण विभागात औषधसाठ्याची रजिस्टरमध्ये परिपूर्ण नोंद असली पाहिजे. नेत्रोपचार कक्षातील बंद मशिन तत्काळ बदलून घ्यावे. इमारतीची आवश्यक दुरुस्ती व्हावी. स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती व्हावी आदी निर्देश त्यांनी दिले. हरिसाल येथील पीएचसीत रॅम्पला रेलिंग बसवून घ्यावे अशी सूचनाही त्यांनी केली. दुर्गम भागात केंद्र किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी आवश्यक वाहने उपलब्ध असावीत. तसा प्रस्ताव द्यावा असेही निर्देश त्यांनी दिले. त्यांनी रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेची,  तसेच रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता कक्ष, प्रसूती पश्चात कक्ष, सोनोग्राफी कक्ष, दंत विभाग, औषध वितरण कक्ष, पेयजल सुविधा, स्वच्छतागृहे आदी प्रत्येक बाबीची तपासणी केली. सर्व सुविधा सुरळीत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. कन्याजन्माचे स्वागत म्हणून प्रसुतीपश्चात कक्षात दाखल मातांना कपडे वितरीत करण्यात आले.

दौऱ्यात आरोग्य मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मेळघाटातील आरोग्य केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करत असून सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी एएनएम महिला कर्मचाऱ्यांनी केली. या कर्मचारी अनेक वर्षांपासून मेळघाटात आरोग्य सेवेत आहेत. त्यांच्या मागणीनुसार अतिरीक्त वेतन व इतर सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करु असे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed