पुणे, दि.२७ : शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज अवगत व्हावेत, त्यांचे कर्तृत्व समजावे यासाठी नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून किल्ले राजगड येथे सुखरुप परतल्याच्या ३५६ व्या सुटका स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील लाल महाल येथे लाक्षणिक पालखीचे प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लाक्षणिक पालखीचा प्रस्थान शुभारंभ लाल महालातून पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त माधव जगताप, व्याख्याते डॉ. अजित आपटे, शिवसृष्टी पुणेचे जगदीश कदम, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, अध्यक्ष संजय दापोडीकर, सचिव अजित काळे, खजिनदार अनिरुद्ध हळदे, उपाध्यक्ष सुनील बालगुडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय नोकरीसाठी ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योगा, कला इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य कळण्यासाठी १०० गुणांचा पेपर ठेवण्यात येईल.
छत्रपतींच्या काळातील विहिरी व तटबंदी अजूनही शाबूत असून त्या काळातील बांधकाम किती चांगले होते ते कळते. आग्र्याला ते जेव्हा अटकेमध्ये होते त्यावेळी स्वराज्यावर आर्थिक संकट आले होते.त्यावेळी त्यांनी तेथील सावकारांकडून अष्टप्रधानांकडे पैसे पुरविले होते. ते त्यांनी सुटकेनंतर व्याजासह परत केले. शिवाजी महाराज एक खरे आर्थिकतज्ञ आणि व्यवहारात चाणाक्ष होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा स्मृती सोहळा श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ हे सातत्याने ४२ वर्षापासून करीत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
असे आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील ४१ वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. यंदा पालखी प्रस्थान सोहळ्याला उत्सवाचे ४२ वे वर्ष आहे. ३ डिसेंबर रोजी राजगड पायथा पाली गाव खंडोबाचा माळ येथे सायंकाळी गड जागरण कार्यक्रम होणार आहे. तसेच राजगडावर पद्मावती माता मंदिर येथे व्याख्याते योगेश पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार ४ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत आणि त्यानंतर पद्मावती माता मंदिर येथे पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
000