मुंबई दि.18 : दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना पहिल्या वर्षी जागेच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळते. तर, दुसऱ्या वर्षापासून नियमानुसार पूर्ण भाडे आकारले जाते. मात्र, आता दुसऱ्या वर्षीच्या भाड्यामध्ये 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 160 वी बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपट अनुदान प्रक्रिया सुधारून ती कालबद्ध करावी. तसेच महामंडळ आणि चित्रनगरीच्या विविध सेवा या ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गतिमान करण्यात येईल. चित्रनगरीची सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्यासाठी विविध पर्यायांसह डिजिटल करण्याच्या प्रस्तावास त्यांनी संमती दिली.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे निर्मिती संस्थांना आर्थिक दिलासा मिळणार असून अधिक सुरक्षित वातावरणात चित्रिकरण करता येणार आहे. चित्रनगरीचा कायापालट करण्यावर भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात चित्रनगरी लवकरच मोठी झेप घेईल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी महामंडळाच्या संबंधी विविध ठरावांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात चित्रनगरीच्या परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न आदी विषयांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.
बैठकीला सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, उप सचिव विद्या वाघमारे, उप सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी सई दळवी, मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय भालेराव, उप अभियंता (सिव्हिल) संतोष कुमार मुरुडकर, सहायक प्रशासन अधिकारी तुकाराम खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.घोसाळकर आदी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
०००००
वर्षा आंधळे/विसंअ