”इंद्रधनुष्य 2022” या अठराव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. 5 ते 9 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले होते. या महोत्सवात 21 विद्यापीठांच्या 826 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून 29 कलाप्रकार सादर केले. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. या महोत्सवाचा थोडक्यात परिचय……..
देश व राज्य पातळीवर चांगले कलाकार, खेळाडू, उत्तम वक्ते घडवण्यासाठी विविध महोत्सवांचे आयोजन केले जाते. अशा महोत्सवांच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर आपल्या विविध कलागुणांना वाव देता येतो. भविष्यात उत्तम कलाकार होण्यासाठी अशा महोत्सवाचा फायदा युवकांना निश्चितच होतो. देशात, महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असून कला क्षेत्रातसुध्दा अग्रेसर आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासन व विविध संस्था प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून राज्यातील, सर्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव ”इंद्रधनुष्य” या नावाने 2003 मध्ये तत्कालीन मा. राज्यपाल श्री. महंमद फजल यांच्या मार्गदर्शनाखाली ”इंद्रधनुष्य युवक महोत्सव” सुरू करण्यात आला होता.
प्रत्येक समाजात एका पिढीकडून दुस-या पिढीला सामाजिक, सांस्कृतीक संचिताचे संक्रमण होत असते. महाराष्ट्र राज्याला कला व संस्कृतीची गौरवशाली ऐतीहासीक परंपरा लाभलेली आहे. या कलेची जोपासणा करणे, तीचे संवर्धन करणे आणि महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय कलावंत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पारंपारीक लोककलांचे जतन व संवर्धन करणे या उद्देशांनी इंदधनुष्य आंतरविद्यापीठीय सांस्कृतीक युवक महोत्सवाची सुरुवात केलेली आहे. ही स्पर्धा, संगीत, नृत्य, वाड्.मय, रंगमंच, ललीतकला, लघुचित्रपट आणि सांस्कृतीक रॅली या सात विभागामध्ये विभागली आहे. या सात विभागाचे पुढे 30 विविध कला प्रकारामध्ये या स्पर्धा घेतल्या जातात.
यंदाच्या राहुरी येथे पार पडलेल्या ”इंद्रधनुष्य” कला महोत्सवातून, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलावंत विद्यार्थ्यांची मांदियाळी कलापंढरीत एकत्र येवून त्यांनी आपली कला सादर केली. यामुळे आपले ज्ञान व कलाकौशल्य सादरीकरणाला व्यापक मंच इंद्रधनुष्याच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला होता. 2003 साली सुरु झालेल्या या युवक महोत्सवाचे यंदाचे अठरावे वर्ष होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी झाले.
इंद्रधनुष्य या युवक महोत्सवात राज्यातील विविध 21 विद्यापीठांचे एकुण 826 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये 445 विद्यार्थी व 381 विद्यार्थिनी तसेच 68 प्राध्यापक सहभागी झाले होते. या महोत्सवात 29 कला प्रकार सादर करण्यात आले. या महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने पटकविले. तर सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक सावित्री फुले पुणे विद्यापीठाने पटकाविला. गोल्डन बॉयचा पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या अथर्व ओंकार वैराटकर याने तर गोल्डन गर्लचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाची रीया धनंजय मोरे हिने पटकाविला. या महोत्सवात मुख्य 5 प्रकारचे सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. यामध्ये संगीत प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद सावित्री फुले पुणे विद्यापीठ यांनी पटकाविले, तर नृत्य वाड्.मय कला प्रकार, रंगमंचीय कला, ललीत कला या प्रकारात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. यामध्ये 29 कला प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांचे वाटप असे एकूण 87 बक्षिसांचे वाटप करण्यात आली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नयनरम्य परिसरात या महोत्सवाचे विद्यापीठाने अतिशय उत्तम नियोजन केले होते.
- डॉ. रवींद्र ठाकुर, जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर