• Sun. Nov 24th, 2024

    *किनवट तालुक्यात ‘दंडार’ लोकनृत्याची धूमाकुळ*

    ByMH LIVE NEWS

    Oct 28, 2022
    *किनवट तालुक्यात ‘दंडार’ लोकनृत्याची धूमाकुळ*

    *नांदेड-किनवट, दि.28 (प्रतिनिधी) :*

    किनवट या आदिवासीबहुल तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळी निमित्त होणाऱ्या पारंपरिक‘दंडार’ या लोकनृत्याने गावागावात आनंदाचे उधाण आले आहे. आजच्या संगणक युगातही आदिवासी समाजाने आपली प्राचीन लोकसंस्कृती टिकवून ठेवली असून, दसर्यापासून सुरुवात होऊन दिवाळीपर्यंत चालणारे हे ‘दंडार’ लोकनृत्य ते पिढानुपिढ्या जोपासत आलेले आहेत.
    तेलगंणा राज्याच्या सीमेवरील किनवट तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासी लोक मुळातच नृत्य-गायनाचे विलक्षण दर्दी असतात. त्यांच्या या नृत्य-गीतांचा उगम निसर्गातल्या शक्तींना संतुष्ट करण्यासाठी झालेला आहे. निसर्गशक्तींना संतुष्ट केल्याने पीक-पाणी अमाप येते व शिकार चांगली मिळते, अशी त्यांची पूर्वापार समजूत आहे.
    ‘दंडार’ मुळात हे डोंगर दरीत वास्तव्य करणाऱ्या गोंडी बोलीभागातील लोकप्रिय नृत्य होते कालांतराने त्यात लोकनाट्याचा अंतर्भाव झाला. आठ – दहा जणांचा समूह हातात ‘टाहारा’ नावाची दीड फूट लांबीची काठी घेऊन केलेला नाच हे या लोककलाप्रकाराचे एकमेवाद्वितीय वैशिट्य आहे. झाडीपट्टीत शेताला ‘दंड’, तर झाडाच्या फांदीला ‘डार’ म्हटले जाते. शेतातील पिकलेला शेतमाल घरी आल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करण्यासाठी समूहनृत्य करीत असावेत. यातून ‘दंडार’ अवतरली, असे सांगितले जाते. ढढार, दंढार आणि गंडार या संज्ञादेखील दंडारसाठी रुढ आहेत. ‘दंडार’ नृत्य हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव विविध कलागुणांनी पारंपरिक नृत्यांनी ते साजरा करतात. त्यात दसर्याच्या दिवसापासून आदिवासी बांधव देवदेवतांना साक्षी ठेवून पारंपरिक पोषाख परिधान करतात. मोराच्या पिसांचा टोप डोक्यात घालून जवळपास 15 ते 20 जण दंडार नृत्यासाठी सज्ज असतात. त्यातील एकास प्रमुख मानून त्याला ‘घुसाडी’ ही उपमा देण्यात येते. तो साडी परिधान करून नाचतो. या दंडारीत नाचासोबत विनोदी असे खडे सोंग दाखविले जाते. या सोंगांना ‘झडती’ असे नाव आहे. रात्री नाट्य प्रवेशासारखे प्रवेश दाखविण्याकडे कल असतो. या दंडारीला ‘परसंगी’ असे नाव आहे. अन्य प्रसंगी एखाद्या दिवाणखान्यात बसून दंडारीतील लावण्यांचे गायन होते, ती ‘बैठी दंडार’ होय.
    दंडारीत सात-आठ नर्तक पायात घांगर्या बांधून आणि उजव्या हातात ‘टाहारा’ धरून नाचतात. त्यांच्या मागे लावणी गाण्यात तरबेज असणारा शाहीर, ढोलकी वाजविणारा ढोलक्या, चोनके वाजविणारा चोनक्या, टाळकरी आणि ‘री’ ओढणारा सहायक असतो. ही सारी मंडळी ‘झिलकरी’ या नावाने ओळखली जातात. प्रथम ‘गण’ गायीला जातो. त्यानंतर ‘सूत्रधार’ प्रवेश करतो. त्याच्या नंतर ‘विदूषक’ येतो. सूत्रधार आणि विदूषक यांच्या संवादातून दंडारीचे उद्दिष्ट स्पष्ट केले जाते. श्री ला आवाहन केले जाते. तत्पूर्वी दंडारातील पात्र सदारंगलाल आणि सदागुलज़ार झाडझूड आणि सडासंमार्जन करून रंगभूमी शुचिर्भूत करतात . श्री येऊन कार्य सिद्धीस जाण्याचा आशीर्वाद देतात आणि येथे दंडारीचा पूर्वरंग समाप्त होतो. त्यानंतर झडत्या सादर होतात. उत्तररात्री परसंगी दंडार प्रारंभ होते. हेच श्रोत्यांचे प्रमुख आकर्षण असते. या भागात रामायण आणि महाभारत यावर आधारित प्रसंग सादर केले जातात. या दंडारीची संहिता क्वचितच आढळते. दंडारीतील या सादरीकरणावर कवी श्रीधर यांच्या पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय या ग्रंथांचा प्रभाव प्रामुख्याने आढळून येतो. दंडारीच्या सादरीकरणात महिलांचा
    समावेश झालेला नाही. आजही दंडारीत महिलांची कामे पुरुषच करतात.
    दंडात विविध प्रकारच्या लावण्या सादर करण्यात येतात. त्यांचे सिनगारी, पाखंडी, लस्करी, रामायनी, ऐतिहासिक आणि सामाजिक असे प्रकार पडतात. हे सारे शब्द दंडारकर्मीनी पाडलेले आहेत. सिनगारी लावणीत नावाप्रमाणे श्रुंगार वर्णन केलेला असतो. हा शृंगार सामान्यतः सर्वसामान्यांच्या अभिरुचीच्या कक्षेतील असतो. शृंगार भडक असेल तर अशा वर्णनाने युक्त लावणीस पाखंडी लावणी असे नाव देण्यात येते. रामायनी लावणीत रामायणातील प्रसंगाचे वर्णन असते. ऐतिहासिक लावणीत महाभारतातील प्रसंगाचे वर्णन असते. समकालीन सामाजिक मुद्देही लावण्यात मांडले जातात, अशा लावण्या सामाजिक लावण्या समजल्या जातात . ‘दंडार’ या लोकनाट्याचा झाडीबोली विभागातील लोकजीवनावर विशेष प्रभाव आहे. बदलत्या काळाबरोबर हा रंजनप्रकार लयास जाण्याची दुश्चिन्हे आहेत; परंतु गोंडीयन संस्कृती गोंडी बोलीभाषा चळवळीच्या माध्यमातून या लोककला प्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.

    *“अनादी काल खंडा पासून नृत्य-गायनादी विविध पारंपरिक कलागुनाची जपवणूक करून संस्कृतीचा दीप तेवत ठेवून नवयुवक मंडळी संस्कृतीचा अमूल्य ठेवा जोपासून आत्मसात करीत आहे . परंतु अनादी काळापासून आदिवासी हित संस्कृती संवर्धनासाठी येथील प्रस्थापित शासनाने साधे दखल देखील घेतली नसून आदिवासी समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले पूर्वीच्या शासनाकडून दीर्घकाळ उपेक्षा केल्या गेलेली आहे. त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. ही लाजिरवाणी शोकांतिका आहे .भविष्यात आदिवासी सुप्त कला गुणांना वाव संस्कृती जपवणुकीसाठी आदिवासी कला, संस्कृती व परंपरा जगासमोर येण्यासाठी . सांस्कृतिक ठेवा जतन करणार्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक ,आर्थिक उन्नतीसाठी मी समाज ऋणातून पुढाकार घेऊन सर्वोतोपरी प्रयत्न माझी नैतिक जवाबदारी समजूनकरणार आहे*
    *आमदार भीमराव केराम, किनवट-माहूर मतदारसंघ.*

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed