• Sun. Sep 22nd, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ

ByMH LIVE NEWS

Sep 20, 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ

मुंबई, दि. 20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन, भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य सुरू आहे. या समितीत कार्यरत असलेल्या सदस्य सचिव व सदस्यांना काम करताना त्यांच्या पदाला अनुसरून मानधन व सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांच्या मानधनात 10 हजार रुपयांवरुन 25 हजार रुपये अशी वाढ करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या समितीला सोयीसुविधा दिल्यास दर्जेदार काम वेळेत पूर्ण होईल. यापूर्वी समितीच्या सदस्य सचिवांना 10 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यात वाढ करण्यात येत असून आता 25 हजार मानधन देण्यात येईल. समितीचे संशोधन व प्रकाशनाचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. समितीला कार्यालय उपलब्ध करण्यासोबतच सदस्यांना अभ्यास व इतर कामकाज करण्यासाठी शासकीय महाविद्यालय व विद्यापीठात जागेची व्यवस्था याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. समितीकडे उपलब्ध हस्तलिखित जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असेही श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला आमदार लहू कानडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, पुणे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव, सहसंचालक डॉ.सोनाली रोडे, समितीचे सदस्य, प्रा. सिद्धार्थ खरात, ज.वि. पवार, डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ.योगीराज बागुल, डॉ.संभाजी बिरांजे, डॉ. धनराज कोहचाडे, डॉ.कमलाकर पायस, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed