• Sat. Sep 21st, 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2022
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॉस्को, दि. 14 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे संस्थात्मक काम केले. त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

रशियातील मॉस्को येथे आज सकाळी मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अमित गोरखे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण व्हावे आणि ती संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी मोठे कार्य आपल्या आयुष्यात केले. वंचितांचा आवाज बनून त्यांनी काम केले. सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण, तरीही इतके मोठे कार्य त्यांनी उभे केले. एकही दिवस शाळेत न गेलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएचडी करतात.

मॉस्को स्टेट लायब्ररीने हा उपक्रम हाती घेतला, मुंबई विद्यापीठाने सुद्धा यात सहभाग घेतला, याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामान्य माणसाला प्रेरणा मिळायची आणि आजही त्यांचे साहित्य हे सामान्यांना जगण्याची ताकद देते. ‘फकिरा’तून अनेक कथा त्यांनी समाजापुढे आणल्या. अनेक संघर्षशील व्यक्तिमत्त्व त्यांनी जगापुढे आणले. रशियाचा दौरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केला, त्यावेळी त्यांनी रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियातील क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. पृथ्वी ही शेषनागावर नाही, तर श्रमिकांच्या डोक्यावर उभी आहे, हे सातत्याने ते सांगत. आज याठिकाणी त्यांच्या स्मृती उभ्या राहत आहेत, हा त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे. प्रत्येक मराठीजनाचा, महाराष्ट्रीयन माणसाचा सुद्धा हा गौरव आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय नागरिकांशी संवाद

दरम्यान, काल रात्री झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी रशियातील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. रशियन उद्योग जगत आणि भारतीय दुतावासातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. रशिया हा नेहमीच भारताचा चांगला मित्र राहिला आहे. व्यापार असो की संस्कृती सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये आणि नागरिकांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत उत्तम प्रगती करतो आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याची झेप घेतो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. युवा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंधांचाही अमृत महोत्सव, निर्यात धोरण, बंदरविकास, पर्यटन अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराचेही एक सत्र झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed