• Sat. Sep 19th, 2026

सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 18, 2026

सिंधुदुर्ग, दि. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यातील चराठे ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला.

या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी तसेच आजाराचा धोका असलेल्या व्यक्तींची लवकर ओळख करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. महिला व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती, समुपदेशन तसेच आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे.याशिवाय रक्तदान शिबिरे, योग, ध्यान, शारीरिक सक्रियता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येणार असून, व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबतही जनजागृती केली जाणार आहे. अंगणवाडी तसेच समुदाय स्तरावर आयोजित विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आयुष्मान आरोग्य मंदिर, चराठे येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच असंसर्गजन्य आजारांचा धोका असलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या विविध आरोग्य उपक्रमांचा ७३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

दि. सप्टेंबरपासून सुरू असलेल्या ‘तिशीचा पल्ला—तपासणी अन् सल्ला’ या मोहिमेबाबत जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या काळात ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६  या कालावधीत सावंतवाडी तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य, ICDS (एकात्मिक बाल विकास सेवा) तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed