• Thu. Sep 3rd, 2026

Pune News : याला अजून मारायला हवं होतं, जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा उन्मादपणा

पुण्यात डीजेवर बंदी घालावी अशी मागणी करणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ समोर आला आहे. संतोष चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा उन्मादपणा दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील गणेशोत्सवामध्ये डीजेला बंदी घालावी यासाठी सामान्य पुणेकर असणारे विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पुणेकरांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वप्रथम विद्यानंद बापट यांनी डीजेला बंदी घालावी, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर विद्यानंद बापट यांना गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आज त्यांना संतोष चव्हाण नामक इसमाने पुण्यातील टिळक रस्त्यावर मारहाण केली.

संतोष चव्हाण मारहाण केल्यानंतर काय म्हणाला?

हा संतोष चव्हाण फक्त मारहाण करून थांबला नाही तर मारहाणीनंतर त्याचा मस्तवालपणा सुद्धा समोर आला. बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण म्हणाला, ‘याला मारला नाही. याला अजून मारायला पाहिजे होता. माझं इतकच म्हणणं आहे पुणे शहरामध्ये फक्त गणेश उत्सव इतकेच मुद्दे आहेत का? मला काही भूमिका मांडायची नाही. माझी काही भूमिका नाही. पण जो गणेश उत्सवाबद्दल बोलेल त्याला असेच काणामागे देणार’. त्यामुळे मारहाण केल्यानंतर या संतोष चव्हाणला कुठलाच पश्चाताप नव्हता हे स्पष्ट दिसत होतं.

संतोष चव्हाण कोण आहे?

संतोष चव्हाण हा मूळचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. त्याच्यावर पुण्यामध्ये यापूर्वी पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये कट रचने, मारामारी करणे यांसारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. इतकंच नाही तर या संतोष चव्हाणने आपल्या पित्यावर सुद्धा हात उचलण्याची माहिती समोर आली आहे.

संतोष चव्हाण हा दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करत असतो. मात्र, यावर्षी दहीहंडी कार्यक्रमाला आपल्या मनाप्रमाणे डीजे लावता येणार नाही याचा राग त्याच्या मनात होता. आणि याच रागातून त्याने विद्यानंद बापट या लोकशाही मार्गाने संयत भूमिका मांडणाऱ्या पुणेकरावर हात उचलला. संतोष चव्हाणच्या या कृत्यावर पुण्यात सर्वात स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मारहाणीनंतर काय म्हणाले विद्यानंद बापट?

“पत्रकार मला प्रश्न विचारत होते, तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहेत, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का?”, असं विद्यानंद बापट म्हणाले.