• Thu. Sep 3rd, 2026

Tukaram Mundhe : मला माहिती मी देव नाही, कोर्टाच्या आदेशांनुसार सुधारणा करु, तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

तुकाराम मुंढे यांच्याकडून अन्न सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या दरम्यान एका प्रकरणात कोर्टाने अन्न आणि औषध प्रशासनाचे कान टोचले होते. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगले आणि स्वच्छ अन्नाची आवश्यकता आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी अन्न पदार्थांच्या सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुकाराम मुंढे हे देखील यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्याकडून विविध हॉटेल, रेस्टॉरंट, दूध डेअरी, दूध संकलन केंद्र या ठिकाणी छापा टाकून तपासणी करण्यात आली आहे. तसेच गुटखाच्या विरोधातही कडक कारवाई केली जात आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियम न पाळणाऱ्या आस्थापनांवर थेट परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेक अस्थापनांचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अशाच एका कारवाईच्या विरोधात एका आस्थापनाच्या मालकाने कोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टाने अन्न आणि औषध प्रशासनावर कारवाईचा अतिरेक होत असल्याचं ठणकावलं होतं. तसेच कोर्टाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे देखील ओढले होते. याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?

तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (3 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी कोर्टाने ताशेरे ओढल्याबाबतच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “मला माहिती आहे मी देव नाही. मी तुकाराम मुंढे आहे. तुकाराम मुंढे हा लोकसेवक आहे. मी त्याबाबत खूप क्लिअर आहे. काही होत नाही. आपण प्रोसिजर फॉलो करतो. जिथे त्रुटी होत असतील आणि कोर्ट आम्हाला दाखवत असेल तर आम्ही त्यामध्ये सुधारणा करु”, अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.

यावेळी एका पत्रकाराने विचारलं की, आता सण साजरी करण्यासाठी एफडीएची परवानगी घ्यायची का? त्यावर तुकाराम मुंढे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. “सहन साजरी करण्यासाठी आमची परवानगी घ्या, असं आम्ही म्हणालो आहोत का? कृपया दिशाभूल करु नका. असं नाही करायचं”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

Maharashtra TimesPune News : याला अजून मारायला हवं होतं, जो गणेशोत्सवावर बोलेल त्याला मारणारच; बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा उन्मादपणा

अन्नदान करणाऱ्यांना आदेश काय?

“जे अन्नदान करणार आहेत किंवा भंडारा ठेवणारे आहेत त्यांनी एफडीएला अन्नदान करणार आहोत याची माहिती एफडीएला द्यावी. त्यामुळे त्यांच्या अन्नाचे सॅम्पल आम्हाला घेता येईल”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

Maharashtra TimesPune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी“कोणताही कार्यक्रम असूद्या. ज्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात अन्न बनवत आहात, ते विकत आहात किंवा वाटत आहात त्यांनी एफडीएला माहिती द्यावी. याचा उद्देश कुणाला त्रास देणं नाही तर सेफ फूड करणं आहे. कार्यक्रमांमध्ये जे घरातलेच जेवण बनवत असतील तर त्यांच्यासाठी हा नियम लागू राहणार नाही. पण जे केटररला बोलावतील त्यांच्यासाठी हा नियम लागू राहील”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

दोन सेलिब्रेटींचे उत्तर आले

दरम्यान, एका जाहिराती प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने तीन सेलेब्रेटींना नोटीस बजावली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तीन सेलिब्रेटींना नोटीस पाठवली होती. त्यापैकी दोघांचे उत्तर दोन दिवसांपूर्वी आलेले आहेत. एकाचं प्रतिक्षेत आहे. दोघांच्या उत्तरावर आमची पुढची प्रक्रिया सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.