मुंबई, दि. २: आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधींना गती देणे, पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीस खासदार हेमंत सावरा, आमदार राजू तोडसाम, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), अवर सचिव संजय पाटील तसेच विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा, पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी आणि कायदेशीर अंमलबजावणी व्हावी तसेच सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक, कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीची सकारात्मक दखल घेऊन त्यावर नियमानुसार आणि प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल.
पेसा संवर्गातील पदे, बिंदूनामावली व रिक्त पदांची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणीनंतरची अद्ययावत माहिती विद्यार्थी प्रतिनिधींना पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती यवतमाळ जिल्हा प्रशासनाने बैठकीत दिली.
बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र, पेसा व नॉन-पेसा पदभरती, एमपीएससीमार्फत होणारी तलाठी भरती, बिंदूनामावलीची फेरपडताळणी तसेच स्थानिक आदिवासी आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांशी आवश्यक पत्रव्यवहार करून प्रक्रियेमधील संभ्रम दूर करण्यासह पारदर्शक व कालबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देशही आदिवासी विकास मंत्री वुईके यांनी दिले.
बैठकीत पेसा व अधिसंख्य पदभरती, जात वैधता, बिंदूनामावलीची पडताळणी, भरती प्रक्रियेतील मुद्दे तसेच विविध विभागांशी संबंधित प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विषयांवर समन्वयाने, पारदर्शक पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागांना देण्यात आले.
0000
अश्विनी पुजारी/विसंअ