• Wed. Sep 2nd, 2026

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवा गतिमान, पारदर्शक करणार – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 2, 2026

मुंबई, दि. २ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आवश्यकतेनुसार मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ताज प्रेसिडंट येथे आयोजित सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डिजिटल हेल्थ केअर परिषदेत भविष्यातील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांबाबत आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, मित्रा संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सुधीर मेनन, डॉ. नारायणी यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरोग्य सेवांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. या निधीचा परिणामकारक वापर करून नागरिकांना योग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी डिजिटल प्रणाली, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना प्रभावी नियोजन, अचूक माहिती आणि नियमित संनियंत्रण महत्त्वाचे आहे. अन्य राज्यांनी विकसित केलेल्या केंद्रीकृत आरोग्य संनियंत्रण पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त आणि परिणामकारक मॉडेल विकसित करता येईल. तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा वितरणातील त्रुटी ओळखणे, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि आवश्यक सुधारणा करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाची लोकसेवेप्रती असलेली बांधिलकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे कौशल्य यांचा संगम झाल्यास विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळेल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच निधीचा पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

चर्चासत्रात सहभागी कंपन्या, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी व्यवहार्य, सकारात्मक आणि ठोस सूचना मांडाव्यात. या सूचनांच्या आधारे सार्वजनिक आरोग्य विभागासाठी प्रभावी डिजिटल संकल्पना विकसित करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा अंतिम लाभ राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आरोग्यपूर्ण हास्य फुलले पाहिजे, हीच शासनाची भूमिका आहे. दिवसभरातील परिसंवादातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा ठोस कृती आराखडा पुढे येईल, असा विश्वासही मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.

यावेळी स्पेशल इश्यू ई हेल्थ मॅगिझीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तर कॅन्सरवरील तपासणी आणि लगेच उपचार तंत्रज्ञानाचा शुभारंभही मंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध तंत्रज्ञानांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

0000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed