• Wed. Sep 2nd, 2026

जैवउत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती देणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 2, 2026

मुंबई, दि. २ : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संधींचे प्रत्यक्ष प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे पणनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून महाराष्ट्रातील जैवउत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन सहकार्याच्या संधींबाबत संवाद साधला. बैठकीस केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे उपमहावाणिज्यदूत ख्रिश्चन जॅक, इडन ब्रू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब ब्राऊन, न्युवेरा बायो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लुसी सेमेनेक, हायजीन रिन्यूएबल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस ब्राऊन, ऑस्ट्रेलियाच्या जनुक तंत्रज्ञान नियामक कार्यालयाच्या मिशेल वूस्टर आणि ऑस्ट्रेलियाच्या अन्न मानके कार्यालयाच्या गायत्री सुब्रमण्यम उपस्थित होत्या.

शाश्वत विकासासाठी कटिबद्ध

पणनमंत्री श्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र आहे. जैवतंत्रज्ञान, नवकल्पना तसेच कृषी, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील जैवआधारित उपायांच्या माध्यमातून राज्याचा विकास अधिक शाश्वत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.ऑस्ट्रेलियाकडे जागतिक दर्जाचे विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल आणि संशोधन क्षमता असून महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता आहे. या सामर्थ्यांच्या आधारे दोन्ही अर्थव्यवस्थांना लाभदायक ठरणाऱ्या मूल्यसाखळ्या विकसित करता येतील.

प्रस्तावित टास्क फोर्स आणि संयुक्त प्रकल्प

पणनमंत्री श्री रावल म्हणाले, प्रिसिजन फर्मेंटेशनवर आधारित जैविक रंग, पर्यायी प्रथिने, शैवालाधारित उत्पादने तसेच कृषी कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत मोठी क्षमता आहे. ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी महाराष्ट्रात प्रायोगिक प्रकल्प राबवावेत, उत्पादन सुरू करावे आणि त्याचा विस्तार करावा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कंपन्या आणि संशोधकांना ऑस्ट्रेलियातील बाजारपेठा, तंत्रज्ञान आणि भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

प्रस्तावित टास्क फोर्सच्या माध्यमातून संयुक्त प्रकल्पांची निवड, नियामक समन्वय आणि उभय दिशेने होणाऱ्या गुंतवणुकीला गती देण्यात येईल. ऑस्ट्रेलिया आणि भारतातील अन्न व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक तसेच संशोधन संस्थांमध्ये अधिक दृढ सहकार्य निर्माण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. महाराष्ट्रातील केवळ ऑस्ट्रेलियन गुंतवणूक नव्हे, तर तंत्रज्ञान, व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीची द्विपक्षीय भागीदारी विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी प्रस्ताविकात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची माहिती दिली.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed