मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा सन्मान तसेच त्यांनी गायलेल्या, स्वरबद्ध केलेल्या आणि संगीत संयोजन केलेल्या गीतांचा व नृत्याचा विशेष स्वरसोहळा ‘अमृताहुनी गोड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा विशेष कार्यक्रम होईल. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कलाकृतींचे स्मरण करणे आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाचा नव्या पिढीशी परिचय करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अजित कडकडे, डॉ. मंजिरी देव आणि अप्पा वढावकर यांचा सन्मानार्थी व विशेष सहभागी म्हणून सहभाग असणार आहे. त्यांच्या कलाप्रवासाला उजाळा देत त्यांच्या गायन, स्वररचना आणि संगीताशी संबंधित निवडक कलाकृतींचे सादरीकरण या स्वरसोहळ्यात करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि ओंकार प्रभूघाटे हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. शिल्लक प्रवेशिका रविवार, ६ सप्टेंबर २०२६ पासून नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
संजय ओरके/विसंअ
०००