Shiv Sena vs BJP : अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचा निषेध करताना कल्याण डोंबिवलीतील भाजपचे उपमहापौर म्हणाले, की शिवसेनेने सत्ता स्थापन करताना मनसेबरोबर केलेल्या युतीचा भाजपने आदर केला होता. मात्र मनसेचे वरिष्ठ नेते सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. पुण्यात घडलेला प्रकार निंदनीय असून, अशा पक्षाबरोबर सत्तेत राहणे शक्य नाही.
भाजपच्या गोटात नाराजी
कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना-भाजपला साथ देऊन सत्तेत सहभाग घेतला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एकेरी टीका केल्यानंतर हा वाद चिघळला होता. त्यातच पुण्यात अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांचे छायाचित्र उतरविण्यास भाग पाडल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘त्यांच्यासोबत सत्तेत राहणे शक्य नाही’
मंगळवारी ‘केडीएमसी’तील भाजप गटनेता कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्या कृतीचा निषेध केला. उपमहापौर राहुल दामले म्हणाले, की शिवसेनेने सत्ता स्थापन करताना मनसेबरोबर केलेल्या युतीचा भाजपने आदर केला. मात्र, मनसेचे वरिष्ठ नेते सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. पुण्यातील प्रकार निंदनीय असून, अशा पक्षाबरोबर सत्तेत राहणे शक्य नाही.
Priyanka Satra : कारच्या धडकेत मुंबईकर विवाहितेचा मृत्यू, अंत्यदर्शनाला पती व्हिलचेअरवर आला, चिमुरड्या लेकरांचा टाहो, उपस्थितांच्या काळजाचं पाणी
शिवसेनेने मनसेला युतीतून बाहेर काढावे
‘ज्या पक्षाने आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान केला, त्यांच्याबरोबर आम्ही सत्तेत बसू शकत नाही. शिवसेना-भाजप युती टिकवायची असेल, तर शिवसेनेच्या वरिष्ठांनी मनसेला युतीतून बाहेर काढावे,’ अशी मागणी दामले यांनी केली. शिवसेना काय निर्णय घेते, यावर युतीचे भवितव्य अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपने युतीबाबत शिकवू नये, सेनेचं प्रत्युत्तर
भाजपला प्रत्युत्तर देताना, ‘भाजपने भिवंडी आणि अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसबरोबर युती केली आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला युतीबाबत शिकवू नये. मनसे-शिवसेना युतीबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी व्यक्त केली.
भाजप-मनसेत संघर्ष
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या वादाचे पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने माहीममध्ये आंदोलन केले. या आंदोलनानंतर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले.
दरम्यान, माहीम परिसरात भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे वृत्त असून, पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
Indian Women killed in US : दोन भारतीय महिलांना अमेरिकेत संपवलं, एकामागून एक जीव घेतला, मैत्रिणीलाच अटक
अमित ठाकरेंसह दोघांवर गुन्हा
अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांजवळ लावण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्रावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ते छायाचित्र हटविले. याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजयुमोने मुंबईत आंदोलन पुकारले.
