Thane News: मिरा- भाईंदर महापालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी करण्यात आला. या वेळी नाट्यगृहातील एसी बंद पडल्याने प्रेक्षक चांगलेच हैराण झाले. एसी बंद पडण्याचा हा नवखा प्रकार नसून ‘आमने-सामने ‘नाटकाच्या प्रयोगाला देखील एसी यंत्रणा बंद पडली होती.
शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत मिरा-भाईंदर महापालिकेचे स्व. लता मंगेशकर नाट्यगृह आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी हे नाट्यगृह उभारण्यात आले. येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री प्रताप सरनाईक यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.
प्रेक्षक नाट्यगृहातून बाहेर पडले
कार्यक्रम सुरू असताना नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद होती. काही वेळातच सभागृहात उकाडा वाढला. अनेक प्रेक्षक घामाने हैराण झाले, तर काहींना गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने त्यांनी नाट्यगृहातून बाहेर पडणे पसंत केले.
देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च तरी देखील असा प्रकार घडला
कार्यक्रम तासभराहून अधिक काळ सुरू असतानाही पर्यायी व्यवस्था करण्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची नाराजी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा आणि इतर देखभाल-दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही वारंवार यंत्रणा बंद पडत असल्याने कामाच्या दर्जावर आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai High Court: इस्लाम धर्म स्वीकारल्याने ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस नगरसेविकेला मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला?
आमने- सामने नाटकाच्या प्रयोगादरम्यानही प्रेक्षक घामाघूम
मे महिन्यात ‘आमने-सामने’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वातानुकूलन यंत्रणा बंद पडली होती. त्या वेळी गॅस गळतीचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले होते. भर उन्हाळ्यात नाट्यप्रेमींना उकाड्यातच प्रयोग पाहावा लागला होता.
Thane News: कल्याण- डोंबिवलीमध्ये उत्सव मार्गांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १२० हून जास्त सीसीटीव्हींच्या नजरा खिळणार
गॅस गळतीचे कारण
हा प्रकार पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. रविवारीही यंत्रणा बंद असण्यामागे गॅस गळतीचे कारण सांगितले जात असल्याचे समजते.
