• Mon. Aug 31st, 2026

Crime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला एका इसमाने फोन केला. त्याने किरकोळ कारणावरुन तिच्याशी हुज्जत घातली. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करत उचलून नेण्याची धमकी दिली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : महिला आणि मुलींचा सन्मान करणं ही खूप सर्वसामान्य आणि महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आदराचं स्थान आहे. तसेच संपूर्ण देशात महिलांना देवीच्यास्थानी मानलं जातं. महिलेला दुर्गा देवीची उपमा दिली जाते. तर कधी घरातील लक्ष्मीची उपमा दिली जाते. देशाच्या सामाजिक जडणघडणीत स्त्रियांचादेखील तितकाच मोठा वाटा आहे. आपल्या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक वारसा हा खूप समृद्ध आहे. यामध्ये स्त्रियांचा वाटा मोठा आहे. असं असताना देखील काही विचित्र लोक महिलांचा सन्मान करताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे त्यांची एवढी हिंमत की ते परस्त्रीला शिवीगाळ करायला धजावतात. अशा लोकांच्या मुसक्या आवळणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी महिलेला शिवीगाळ करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका ३५ वर्षीय गृहिणीला फोनवरून अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत, घरातून उचलून नेण्याची आणि बलात्काराची थेट धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार सिडको परिसरातील एन-6, अविष्कार कॉलनी येथे समोर आला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हानोंदवण्यात आला आहे.

नेमका वाद काय?

गजानन रामदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी 34 वर्षांचा आहे. तो जळगावच्या पाचोरा येथील डोंगरगावचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी गजानन याने पीडित गृहिणीच्या मोबाईलवर संपर्क साधला. गावाच्या भंडारामध्ये माझ्या पत्नीच्या नावापुढे तुझ्या गावाचे नाव का घेतले? असा किरकोळ जाब विचारत त्याने फोनवर वाद घालण्यास सुरुवात केली.

पीडितेचे समजावण्याचा प्रयत्न, आरोपीकडून थेट धमकी

पीडितेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीचा पारा चढला. त्याने गृहिणीला फोनवरूनच अत्यंत अश्लील आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर तुला तुझ्या घरातून उचलून नेईन आणि तुझ्यावर बलात्कार करेन, अशी थेट धमकी आरोपीने दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या गृहिणीने तात्काळ कुटुंबीयांशी चर्चा करून सिडको पोलीस ठाणे गाठले.

Maharashtra TimesEknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्य

सिडको पोलिसांत गुन्हा दाखल

पीडित गृहिणीने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी आरोपी गजानन पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. महिलांविरोधातील अशा गुन्ह्यांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस अंमलदार जगताप या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून जळगावच्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना होण्याची शक्यता आहे.