• Mon. Aug 31st, 2026

Manoj Jarange: चॅलेंज दिलं, तरीही शिंदेंचा कार्यक्रम घेतला; बंडू जाधवांवर जरांगे संतापले; आक्रमक इशारा देत काय म्हणाले?

योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. परभणी येथे शेतकऱ्यांच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून त्यांनी बंडू जाधव यांना थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला की, एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे, मी स्वतः अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलो आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करणारे नेते कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. परभणी येथे खासदार बंडू जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगत जरांगेंनी त्यावर आक्षेप घेतला.

यावेळी जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “बंडू जाधव, तू जो कार्यक्रम आयोजित केला आहेस, त्याचा परिणाम तुला आणि एकनाथ शिंदे यांना भोगावा लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. मराठा समाज आरक्षणासाठी उपाशीपोटी आंदोलन करत असताना दुसरीकडे कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तुझ्यासारख्या नेत्यांना बाप मानणारे आम्ही नाही. आमच्यासाठी समाज सर्वस्व आहे, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर निशाणा साधला.

परभणी येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आपण स्वतः परभणीत आलो असतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. मात्र, परभणीला पोहोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजतील आणि तोपर्यंत कार्यक्रम संपून जाईल, असे सांगत त्यांनी परभणीला जाणे टाळल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बंडू जाधव यांच्यावर आक्रमक टीका करत संताप व्यक्त केला. ज्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांचाच कार्यक्रम तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाखाली घेत आहात. इकडे आम्ही उपाशी मरत आहोत आणि तिकडे तुम्ही कार्यक्रमाच्या तोफा उडवत आहात. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील मराठा समाजाने सध्या शांत राहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मात्र, येणाऱ्या काळात या प्रकरणाचा राजकीय पातळीवर जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. बंडू जाधव आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या या टीकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.