• Mon. Aug 31st, 2026

Devendra Fadnavis: जरांगेंकडून शिवसेनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा; फडणवीसांनी घेतली रोखठोक भूमिका, एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाले?

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे घेऊ नयेत, तसेच मेळावा उधळून लावण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने विविध प्रश्नांवर मार्ग काढला असून पुढेही चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, जे काही आंदोलन चालले आहे, त्या आंदोलनामध्ये चर्चा करण्याकरता सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, ते चर्चा करणार आहेत, यापूर्वीही आपण प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढला आहे, आणि पुढेही आपण मार्ग काढणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या प्रक्रियेमध्ये सुरवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जरांगे पाटील यांनी जातपडताळणी समित्या रद्द करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवरही सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक आणि नागरिकांच्या मदतीबाबतही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आपले हे कर्तव्यच आहे की, आपले प्रवासी जिथे अडकले असतील त्यांना बाहेर काढणे. नवीन भारत तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवण दिली आहे की, कुठेही अडचणीत भारतीय असेल तर त्याला मदत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्रातील जे लोक तिथे आहेत, त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी मदत केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची पाहणी केली. त्यांनी सफारी केल्यानंतर वन विभागाची आढावा बैठक घेतली. गोरेवाडा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. इंडियन सफारीनंतर पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आफ्रिकन सफारी हे गोरेवाड्याचे मुख्य आकर्षण ठरणार असून ‘बिग फाईव्ह’ म्हणून ओळखले जाणारे प्राणी येथे पाहायला मिळतील, तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआयच्या माध्यमातून अर्ली वॉर्निंग सिस्टिम विकसित करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. विविध प्राण्यांकडून मिळणारे संकेत आणि कॅमेरा ट्रॅपसह अन्य तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून नागरिकांना वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.