सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “मोहनजींनी केलेल्या वक्तव्यावर आम्ही कॉमेंट नाही करत. पण हे जे तत्व आहे हे खरं तत्व आहे, कारण हिंदुत्वाचा आत्मा सहिष्णुता आहे, जगातील सर्वात जुनी हिंदू सभ्यता आहे. याचं केवळ एकच कारण आहे की आम्ही आपल्या तत्वांना एवढे मजबूत ठेवलं की, जगभरातून आक्रमण झाल्यावर सहिष्णुतेने आम्ही ते सहन केले. अनेक आक्रमकांना आपल्या प्रवाहामध्ये समाविष्ट केले. तसेच जगभरातून जे नाकारलेले लोक होते, त्यांना आपल्या संस्कृतीचा भाग बनवलं आणि भारताच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणले. याचं कारण आपले विचारही सहिष्णू आहेत. रिलीजन टॉलरन्स किंवा सहिष्णुता हे हिंदूंना शिकवू नये, हिंदूंच्या रक्तातच सहिष्णुता आहे, सहिष्णुता म्हणजे मार खाणे नाही, सहिष्णुता म्हणजे सर्वांना सोबत घेऊन सर्वांसोबत एक समभाव, सर्व धर्मांना सन्मान देणे, हे आम्हाला हिंदुत्वाने शिकवले आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
मोहन भागवत नक्की काय म्हणाले होते?
विविधतेतून एकतेचे तत्त्व अधोरेखित करताना अमेरिकेतील कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, ‘विविधतेचे रक्षण झाले पाहिजे. वैविध्य हा निसर्गनियम आहे, तर एकता हे वैश्विक सत्य आहे. मी कोणी धार्मिक विद्वान नाही किंवा तुमच्यासारखा धर्मगुरूदेखील नाही. मात्र, मी अशा समाजात काम करतो, जिथे धर्म भलेही भिन्न असतील, पण मनुष्यजात एकच आहे, अशी पारंपरिक शिकवण आहे.’
‘सत्य एकच असले तरी त्याचे वर्णन विविध मार्गांनी करता येते. लोक त्याचे अनुसरण कसे करतात यावर सत्याचे स्वरूपाचे वर्णन ठरते. कारण, आपल्या मेंदूतील सॉफ्टवेअर जसे बनवले आहे, तसाच विचार आपण करतो’, याकडेही भागवत यांनी लक्ष वेधले.
तत्पूर्वी, शनिवारी सकाळी भागवत यांनी ‘इस्कॉन’च्या कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ‘आज जगात अनेक संघर्ष आहेत, अनेक अंतर्विरोध आहेत. परंतु या सर्वांना एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना. ती चेतना म्हणजे कृष्णभावना. आपण एक आहोत आणि या जगातील द्वैतांमधून आपण ही जाणीव टिकवून ठेवली आहे. जगात विविधता, द्वैत आणि संघर्ष कितीही असले, तरी खरे तर हे सर्व कृष्णच आहे, या दृढ समजुतीने आपण पुढे जात आहोत’, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.
‘कृष्णभावनेमुळे संघर्ष संपतील’
‘आज जगात अनेक संघर्ष आहेत, अनेक अंतर्विरोध आहेत. परंतु, या सर्वांना एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना. ती चेतना म्हणजे कृष्णभावना. आपण एक आहोत आणि या जगातील द्वैतांमधून आपण ही जाणीव टिकवून ठेवली आहे. जगात विविधता, द्वैत आणि संघर्ष कितीही असले, तरी खरे तर हे सर्व कृष्णच आहे, या दृढ समजुतीने आपण पुढे जात आहोत,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी येथे केले. अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भागवत यांनी भेट दिली. त्या वेळी मंदिरातील भक्तांना संबोधित करताना ते बोलत होते. भागवत यांनी या वेळी बेघर नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अन्नवाटप उपक्रमात सहभाग घेतला. ‘सर्व काही कृष्णाचाच भाग आहे, ही समजूत सर्वांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली, तर अधिक चांगले आणि सुसंवादी जग निर्माण करण्यात ती मदत करू शकते. आज आपण पाहतो तसे ते भौतिक जग राहणार नाही, तर प्रत्येक मानवासाठी स्वर्गीय आसरा ठरेल,’ असे ते म्हणाले.