• Sun. Aug 30th, 2026

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 30, 2026

आफ्रिकन सफारीच्या कामाचाही घेतला आढावा; सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश

नागपूर, दि. ३० : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. गोरेवाड्यात सुरू असलेल्या सर्व कामांसाठी नव्याने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील वसंतराव नाईक प्रशासकीय इमारतीत आज आयोजित आढावा बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक(वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, वाईल्डलाइफ रेस्क्यू व ट्रेनिंग सेंटरचे संचालक शिरीष उपाध्ये, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, विभागीय व्यवस्थापक तथा प्राणीसंग्रहालय संचालक पांडुरंग पाखले यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पातील विविध कामांची माहिती घेताना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आफ्रिकन सफारी हा गोरेवाडा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य कामांची पूर्तता कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे निश्चित करून त्यांची पूर्तता कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी गोरेवाडा प्रकल्पाची आतापर्यंतची वाटचाल, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या विविध कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सादरीकरणात देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. या टप्प्यात वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझा यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील ही कामे पूर्ण झाल्यानंतर गोरेवाडा प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. आफ्रिकन सफारीसह महत्त्वाची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहेत. वॉकिंग ट्रेल, आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा, अॅनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांचा समावेश असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. यातील आफ्रिकन सफारीच्या कामाच्या प्रगतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष माहिती जाणून घेतली. सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन यांचा त्यांनी आढावा घेतला. आफ्रिकन सफारी कधी सुरू करता येईल, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत या कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांचा समावेश असल्याची माहिती सादरीकरणात देण्यात आली. या विविध सुविधांच्या माध्यमातून गोरेवाडा प्रकल्पाचा वन्यजीव पर्यटनासोबतच जैवविविधता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. गोरेवाड्याचा विकास करताना दीर्घकालीन पर्यटनाच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात एक ते दोन दिवस पर्यटनासाठी घालवावेत, या दृष्टीने गोरेवाड्याचा विकास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ताडोबा आणि गोरेवाडा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढेल, अशा पद्धतीने सुविधा विकसित करण्याची सूचना त्यांनी केली.

गोरेवाडा प्रकल्पात वन्यजीव पर्यटनासोबत पर्यटकांना विविध अनुभव देणाऱ्या सुविधा विकसित करून विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याची ओळख निर्माण करण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

गोरेवाडा प्राणी उद्यानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed