• Sat. Aug 29th, 2026

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 29, 2026

  • ईव्ही हब म्हणून जगात ओळख निर्माण करू- नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.२९ (जिमाका) – जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये आज २३२ उद्योगांचे १२ हजार ९४४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे २१ हजार ३०६ जणांना रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात आली.

उद्योजकांच्या पंखाना बळ देण्याचे काम शासन करेल, आपण जिद्दीने आपली वाटचाल सुरु करावी, असे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. आता भविष्यात इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचे हब म्हणून जगात ओळख निर्माण करू, असा विश्वास इमाव बहुजन कल्याण, नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी गुंतवणूकदार, व्यावसायिक यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिरसाट होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विभागीय सह आयुक्त (उद्योग) स्वप्नील राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त करुणा खरात, मैत्रीच्या समन्वयक धनश्री जाधव आदी उपस्थित होते.

परिषदेत १२ हजार ९४४ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यात २३२ उद्योगांचा सहभाग आहे. यामुळे २१ हजार ३०६ जणांना रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, लहान पुरवठादार, उद्योजक ते मोठे उद्योग यांच्यातील साखळी मजबूत केली पाहिजे. उद्योजकांना जिद्दीने झेप घ्यायची असते त्यासाठी त्यांच्या पंखाना बळ देण्याचे काम शासन करेल. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत जागेची मागणी वाढली आहे. त्यात आज सामंजस्य करार केलेल्या उद्योगांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री सावे म्हणाले की, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात वाढती गुंतवणूक पाहता दळणवळण, वीज पुरवठा सुविधा, समन्वय केंद्र यासारख्या सुविधा उपलब्धतेचे कामे मार्गी लागले आहेत. उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. म्हणाले की, उद्योगाच्या वाढीसाठी शासनाच्या धोरणानुसार प्रशासन तत्परतेने कामे मार्गी लावत आहे. औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रिया विविध टप्प्यावर सुरु आहेत.

स्वप्नील राठोड यांनी प्रास्ताविक केले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेस मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed