• Sat. Aug 29th, 2026

Mumbai Juhu Beach: पावसाळ्यात किंवा समुद्र खवळल्यानंतर टार बॉल्स समुद्र किनाऱ्याला यायचे प्रमाण वाढते.जुहू किनाऱ्याला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात टार बॉल्स येऊ लागल्याने किनारा काळवंडला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई: जुहू समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ‘टार बॉल्स’ येऊ लागल्याने किनारा काळवंडला आहे. भरतीबरोबर किनाऱ्यावर येणारा कचरा आणि चिकट काळे टार बॉल्स यामुळे सकाळी फिरायला येणारे नागरिक, भाविक तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा प्रकार दरवर्षी घडत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

समुद्र खवळल्यानंतर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण जास्त

गेल्या चार दिवसांपासून जुहू किनाऱ्यावर ‘टार बॉल्स’चे प्रमाण वाढल्याचे स्थानिक नागरिक सुनील कनोजिया यांनी सांगितले. समुद्राच्या भरतीबरोबर मोठ्या प्रमाणावर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येत असून काही भागांत संपूर्ण वाळू काळवंडल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात किंवा समुद्र खवळल्यानंतर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढते. या काळात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत असल्याने हे टार बॉल्स किनाऱ्यावर अधिक प्रमाणात जमा होतात, असेस्थानिकांचे निरीक्षण आहे.

नागरिकांना सर्वाधिक त्रास

मोठे ‘टार बॉल्स’ हाताने किंवा साधनांच्या मदतीने उचलता येतात; मात्र लहान चिकट गोळे उचलणे कठीण ठरते. काही वेळा ते वाळूत मिसळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. टार बॉल्स वाळूत मिसळल्यानंतरच त्यांची स्वच्छता करणे शक्य होते. पावसाळ्यानंतर या प्रकारांचे प्रमाण हळूहळू कमी होते; मात्र पावसाळ्यात किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

त्वचेची जळजळ किंवा इतर त्रास होऊ शकतो

काही नागरिक नकळत ‘टार बॉल्स’ असलेल्या पाण्यात जातात. त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका नसला तरी त्वचेची जळजळ, चिकटपणा किंवा इतर त्रास होऊ शकतो, असे कनोजिया यांनी सांगितले. त्यामुळे किनाऱ्यावर टार बॉल्सबाबत माहिती देणारे आणि खबरदारीचे निर्देश असलेले फलक लावल्यास नागरिकांना मदत होईल, अशी मागणी करण्यात येत आहे.

Maharashtra TimesSangli Crime : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’; एकतर्फी प्रेमातून तरुणाचा मेसेजद्वारे वारंवार त्रास, कंटाळून 19 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं

कचरा आणि ‘टार बॉल्स’ जलचरांसाठीही धोकादाय

पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ वातावरण अनुभवता येत नाही. हा कचरा आणि ‘टार बॉल्स’ जलचरांसाठीही धोकादायक ठरू शकतात. जलचरांकडून टार बॉल्सचे सेवन होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai News: नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांवर अखेर शिक्कामोर्तब झालंच;महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी

तेलकट पदार्थ तिथेच रोखणे गरजेचे

खाड्यांमधून समुद्रात जाणारा कचरा आणि तेलकट पदार्थ तिथेच रोखणे गरजेचे आहे. तेलगळती झालेल्या ठिकाणी तरंगते ‘ऑईल बूम्स’ लावून तेल एका मर्यादित भागात थांबवले जाते. त्यामुळे त्याचे टार बॉल्समध्ये रूपांतर होऊन ते किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा धोका कमी होतो. अशा उपाययोजनांचा विचार केल्यास जुहू किनाऱ्यावरील वारंवारचा ‘टार बॉल्स’चा त्रास कमी होऊ शकतो, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा