• Fri. Aug 28th, 2026

विद्यापीठातून भविष्यातील उद्योग आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

नाशिक, दि. २८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग स्टार्टअपमध्ये रुपांतरीत करण्यासाठी इनक्युबेशन सेंटरची सक्षम परिसंस्था निर्माण करावी. विद्यापीठातून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उप- परिसर प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दुपारी शिवनई, ता. दिंडोरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील अनेक आघाडीच्या कंपन्या आणि नवकल्पनांचा उगम विद्यापीठांमधून झाला आहे. त्यामुळे विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे, पुढे आणणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या क्षेत्रात काम सुरू केले आहे. मात्र, जागतिक पातळीवरील बदल लक्षात घेता नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेला आणखी चालना देण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठातून भविष्यातील मोठे उद्योग आणि ‘युनिकॉर्न’ निर्माण व्हावेत, यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जागतिकीकरणानंतरच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत शिक्षण, रोजगार आणि सेवा क्षेत्र या बाबी परस्परांपासून वेगळ्या ठेवता येणार नाहीत. केवळ पदवीधरांची संख्या वाढविण्यापेक्षा रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण अधिक रोजगारक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे आवश्यक आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या स्वरूपात बदल होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे कौशल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. नाशिक उपकेंद्रामध्ये डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर लक्ष केंद्रित करावे.

नाशिकच्या विकासाचा उल्लेख करतांना श्री. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये कृषी व विशेषतः द्राक्ष उत्पादन आणि निर्यात, अन्नप्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध क्षेत्रांतील उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

मुंबई, पुणे आणि नाशिक हा पूर्वीपासूनच महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा त्रिकोण राहिला आहे. काही काळ नाशिकच्या औद्योगिक विकासाची गती मंदावली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नाशिकच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे नाशिक पुन्हा एकदा वेगाने विकसित होत आहे. पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून नाशिक उदयास येईल. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मानव संसाधन निर्माण होण्यास मदत होईल. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत नाशिकच्या विकासाला हे उपकेंद्र नवी दिशा देईल. तसेच येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. या धोरणाच्या अंमलबजाणीत राज्य अग्रेसर आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या उपकेंद्राचा सर्वांनाच उपयोग होणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी प्रास्ताविक केले. आदर्श उपकेंद्र परिसर उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. अत्याधुनिक शिक्षण येथे देण्यात येईल. नाशिक-पुणे शिक्षणाचा कॉरिडॉर तयार होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार गोकुळ गीते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्र. कुलगुरू प्रफुल्ल पवार, डॉ. पराग काळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे राजेंद्र विखे पाटील, रवींद्र शिंगणापूरकर, सदस्य सागर वैद्य, प्राचार्य देविदास वायदंडे लोकप्रतिनिधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आहे उपकेंद्र

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे कार्यक्षेत्र नाशिक जिल्ह्यासह दादरा नगर हवेली, सिल्व्हासा आहे. या केंद्रास २२ जानेवारी २०२१ रोजी बांधकामाला शासनाने मान्यता दिली. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे ६२ एकर क्षेत्र उपकेंद्रासाठी प्राप्त झाले आहे. त्यापैकी ४० एकर क्षेत्र उपकेंद्राच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे. नूतन इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ३३ हजार चौरस फूट आहे. उपकेंद्रांतर्गत १९६ महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आहेत. या महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या दोन हजार ६०० एवढी आहे, तर अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. संशोधन केंद्रांची संख्या दोन आहे. सध्या एमबीए, बीबीए, मंदिर व्यवस्थापन, कार्यकारी एमबीए, असे अभ्यासक्रम सुरू आहेत. उपकेंद्राची इमारत, फर्निचर, संगणकासह अन्य सुविधांसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या केंद्रात मोफत ई लायब्ररी सुविधा, विद्यार्थ्यांना स्थानांतर व स्थलांतर प्रमाणपत्र तयार करून वितरीत करणे, परीक्षा प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या सर्व तांत्रिक समस्यांचे

निराकरण केले जाते. तसेच संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, सभागृह, विद्यार्थी सुविधा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी रोजगार व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात तंत्रज्ञान व विधी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे, विविध विषयांमध्ये संशोधन केंद्र सुरू करणे, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.

 

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed