• Fri. Aug 28th, 2026

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना ‘तो राजहंस एक…’ सांगितिक कार्यक्रमातून हृद्य मानवंदना – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

मुंबई, दि. २८ : ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्मृतीदिनानीमित्त त्यांच्या संगीतसाधनेला आणि मराठी संगीतविश्वातील अमूल्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘तो राजहंस एक…’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी मराठी भावसंगीताला स्वतंत्र ओळख आणि समृद्ध आशय प्राप्त करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतांमधून भाव, शब्द आणि सुरांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या संगीतसंपदेला मानवंदना देणारा हा विशेष कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

या सांगीतिक कार्यक्रमात अजित परब, धनश्री देशपांडे, मुक्ता जोशी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे गायक कलाकार आपल्या सुमधुर गायनातून श्रीनिवास खळे यांच्या संगीतविश्वाचा अनुभव रसिकांना देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करणार असून, ज्येष्ठ व्हायोलीन वादक महेश खानोलकर हे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

कार्यक्रमात विजू तांबे, प्रशांत लळीत, सागर साठे, अभिजीत सावंत, प्रभाकर मोसमकर आणि दत्ता तावडे हे वादक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना पुष्कर सुधाकर श्रोत्री यांची आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेतील मान्यवर कलाकारांच्या योगदानाचे स्मरण आणि त्यांच्या कलाकृतींचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘तो राजहंस एक…’ या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, विनामूल्य प्रवेशिका मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईतील रसिकांनी या विशेष सांगीतिक मानवंदना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed