• Wed. Aug 26th, 2026

Chhatrapati Sambhajinagar : महापौरांनी खडसावलं अन् आक्रमक नगरसेवक शांत, पालिकेची सभा पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी झाले अवाक

महापालिकेची सभा पाहण्यासाठी एका शाळेचे विद्यार्थी आले होते. यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज पाहताना विद्यार्थी अवाक झाले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी मंगळवारी एका शाळेचे विद्यार्थी आले होते. सभागृहात सदस्यांकडून विचारले जाणारे प्रश्न, गोंधळ पाहून विद्यार्थी अवाक झाले. एरव्ही दूरचित्रवाणी, सोशल मीडियावरून पाहणारी गडबड लाइव्ह पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते. महापौर समीर राजूरकर यांनी विद्यार्थी सभागृहाचे कामकाज पाहत आहेत, जरा भान ठेवा असे सांगितल्यानंतर काही काळासाठी नगरसेवक मंडळी शांत झाली.

हर्सूल येथील कॉलेजचे विद्यार्थी सभा पाहण्यासाठी आले

हर्सूल येथील संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सर्वसाधारण सभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत आले होते. महापौरांची शाळेने रितसर परवानगी घेतली होती.

विद्यार्थ्यांनी पालिकेच्या सभेचा घेतला लाईव्ह अनुभव

आपले नगरसेवक कोणते प्रश्न कसे मांडतात ? कोणत्या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करतात ? एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप कसे करतात? एखाद्या विषयाची माहितीच नसताना बळेच विषय कसा रेटून नेतात? अशा अनेक गंमतीजंमती विद्यार्थ्यांनी लाइव्ह अनुभवल्या.

महापौरांसमोर गोंधळ

या विद्यार्थ्यांनी यापूर्वी दिल्लीत संसदेचे कामकाजही पाहिले असल्याचे शिक्षकांनी सांगितले. एका विषयावरून सुरू झालेल्या चर्चेचे पाहता पाहता वादात रुपांतर झाले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौरांच्या डायससमोरील जागेत विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जमा झाले. हा गोंधळ पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून गेले.

महापौरांनी खडसावल्यानंतर गोंधळ शांत

दिल्ली ते गल्ली लोकशाहीची कार्यपद्धती कशी चालते याचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापेक्षा आपला वर्ग किती शिस्तीचा असतो अशी चर्चा आपापसात सुरू केली. दरम्यान, सभागृहातील गोंधळ वाढत असताना महापौरांनी प्रेक्षक गॅलरीकडे नगरसेवकांचे लक्ष वेधले. शाळेची मुले आपली सभा पाहण्यासाठी आले आहेत. संयम राखा असे महापौर राजूरकरांनी म्हटल्यानंतर गोंधळ शांत झाला.

chhatrapati sambhajinagar

ऑन ड्यूटी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेचे धनादेश प्रदान

दरम्यान, महापालिकेच्या सेवेत कायम कर्मचारी म्हणून कार्यरत असताना नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू झालेल्या अनुक्रमे २१ आणि दोन अशा २३ जणांच्या वारसांना मंगळवारी सर्वसाधारण सभेत विम्याच्या रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळे, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्ष नेते समीर साजीद व गटनेत्यांच्या उपस्थितीत हे धनादेश प्रदान करण्यात आले.

महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याबाबत युनियन बँकेसोबत करार आहे. त्याअंतर्गत बँकेने कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. कामावर असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना आहे. अपघाती मृत्यू झालेले रामदास बमणे आणि अमोल जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक – एक कोटी रुपयांचा तर नैसर्गिक मृत्यू झालेल्या २३ पैकी २० कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये, विपीन दसरे यांच्या वारसांना दहा लाखांचा धनादेश देण्यात आला.