• Wed. Aug 26th, 2026

Pune News : पुण्यात नो दंगा! गेल्या वर्षी टोळीयुद्धाचा भडका, यंदा गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा मास्टरप्लॅन

पुण्यात गेल्यावर्षी गणेशोत्वसात टोळीयुद्धाचा भडका उडाला होता. त्यामुळे यंदा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांकडून कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : पुण्यात गेल्यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या काळात टोळीयुद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. बंडू आंदेकर आणि कोमकर टोळी यांच्यात रक्तरंजित असं टोळीयुद्ध बघायला मिळालं होतं. यामुळे पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यंदा सणासुदीच्या काळात अशाप्रकारच्या कोणत्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खास काळजी घेतली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून अनेक गुन्हेगारांवर मोक्का आणि तडीपाराची कारवाई केली आहे.

सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

सराईत गुन्हेगारांवर कारवाई

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराईत आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विविध कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra TimesMahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?

23 आरोपींवर मोक्काची कारवाई

या कारवाईमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का कायद्यान्वये तीन टोळ्यांमधील एकूण 23 सराईत आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

एमपीडीए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई

याशिवाय एमपीडीए कायद्याअंतर्गत दोन सराईत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील एका आरोपीची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात, तर दुसऱ्या आरोपीची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

सात आरोपींना तडीपारीची नोटीस

तसेच, एकूण सात सराईत आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासोबतच परिसरातील शांतता आणि सुरक्षितता राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना आवाहन

पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे. परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल, गुन्हेगारी कृत्य किंवा समाजविघातक प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.

सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची ही प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.