मुंबई, दि. २४ : राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी वरळी येथील शासकीय परिवहन सेवेच्या कार्यालयास भेट देऊन कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.
शासकीय परिवहन सेवा विभागाच्या या चार मजली शासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर गॅरेज, पहिल्या मजल्यावर कार्यालय व कॅन्टीन, दुसऱ्या मजल्यावर नियंत्रण कक्ष तसेच सुमारे ७० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असून तिसऱ्या मजल्यावर बाल हक्क आयोग, नगर पालिका प्रशासन आणि जिल्हा ग्रंथालयाची कार्यालये कार्यरत असल्याचे सांगून कार्यालयाचे नियंत्रक राजेंद्र भवारी यांनी यावेळी कार्यालयाच्या विविध कामांची तसेच उपलब्ध सुविधांची माहिती दिली. मंत्री रावल यांनी संपूर्ण इमारतीची आणि येथील कामकाजाची सविस्तर पाहणी करुन वाहनचालक, मेकॅनिक्स यांच्याशी चर्चा केली.
पाहणी केल्यानंतर मंत्री रावल यांनी इमारतीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. शासकीय परिवहन सेवेच्या कार्यक्षमतेसाठी कंत्राटी वाहनचालकांची पदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेषतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यासाठी प्रशिक्षित शासकीय वाहनचालकांची आवश्यकता लक्षात घेता, वाहनचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक भरती नियमांना (आरआर) मंजुरी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ