• Sun. Aug 23rd, 2026

विविध विकासकामांच्या माध्यमातून लासलगावचा सर्वांगीण व शाश्वत विकास करणार – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 22, 2026

नाशिक, दि. २१: लासलगाव शहर व परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येतील. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, विद्युत व्यवस्था, आरोग्य, शिक्षण आदी विविध सुविधांच्या माध्यमातून लासलगावचा सर्वांगीण, सुविधायुक्त व शाश्वत विकास करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लासलगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, सरपंच योगिता पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, संकेत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, लासलगाव हे व्यापारी व कृषीविषयक दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येच्या तसेच नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गाच्या सुधारणेमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन कृषी व व्यापारी वाहतुकीला चालना मिळणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, आवश्यक ठिकाणी गटारी व नाल्यांची बांधकामे, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना आणि स्वच्छतेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण, आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिन्या तसेच जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर, कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. लासलगाव नगरपरिषद करण्याचा मानस असून ती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा श्रद्धा परंपरा आणि आध्यात्मिकतेचा महाकुंभ आहे. या कुंभमेळ्यानिमित देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येतील. शिर्डी, लासलगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे परिसरातून नाशिकला येण्याऱ्या भाविकांसाठी हा मार्ग पर्यायी उपलब्ध होऊ शकणार आहे. शहरातील होणारी वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांना सुरळीत, अत्याधुनिक, सुरक्षित व सुलभ रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता नागरिकांसाठी उद्याने, सार्वजनिक जागा, प्रकाश व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांचा विकास करण्याची गरज आहे. त्यानुसार उपलब्ध निधी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून टप्प्याटप्प्याने विकासकामे पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या रस्ते विकासासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल मंत्री भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले.

कृषी व व्यापार क्षेत्राशी संबंधित असलेल्या लासलगावच्या आर्थिक महत्त्वाचा विचार करून बाजारपेठ परिसरातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देण्यात येणार असून, नागरिक व व्यापारी वर्गाला त्याचा लाभ मिळणार आहे. शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून उपलब्ध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात येणार आहे. तसेच या विकासकामांमुळे लासलगाव व परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत अंमलबजावणी यांना प्राधान्य देत नागरिकांच्या अपेक्षेनुसार लासलगावचा नियोजनबद्ध विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विकासकामांमुळे शहराचा सामाजिक, आर्थिक विकासाचा पाया भक्कम  होतो. शहरातील विविध विकास कामे सुरू असून ते प्रगतीपथावर आहेत.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते १०९ कोटी ६८ लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे लोकार्पण, लासलगाव- पाटोदा मार्गावरील सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व पिंपळगाव पालखेड-लासलगाव मार्गाच्या सुधारणा कामाचे सुमारे ४५ कोटी रुपये खर्चाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed