• Tue. Aug 18th, 2026

Thane Property Tax Increase : ठाण्यात मालमत्ता कर वाढणार, नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार, महासभेत प्रस्ताव मंजूर

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात मालमत्ता कर वाढवण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे . या प्रस्तावानुसार ठाण्यात आता निवासी मालमत्ता करात 12 टक्के आणि बिगरनिवासी मालमत्ता करात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : निवासी मालमत्ता करात १२ टक्के, बिगरनिवासी मालमत्ता करात २० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला ठाणे महापालिकेच्या महासभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. शिवाय, अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनाने ग्राह्य धरलेल्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. त्यामुळे ठाणेकरांवरील करभार वाढणार आहे.

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सोमवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत पटलावर आला. करवाढीच्या या प्रस्तावाला भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही विरोध न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी पक्षातील नगरसेवक बोलण्याआधीच या प्रस्तावाला सूचनेसह समर्थन दिले. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

किती कर वाढणार?

मालमत्ता करवाढीतून ठाणे महापालिकेला सुमारे १०४.६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे. ठाण्यात सद्यस्थितीत ५०० चौरस फुटांच्या घराला साडेबारा हजार रुपये मालमत्ता कर आकारण्यात येतो. दरवाढीनंतर तो साधारणतः दीड हजार रुपयांनी वाढून १४ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हे दर विभागानुसार वेगवेगळे असतील.

किती कर आकारला जाणार?

शिवसेना नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचे समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आलेला नाही, त्यांच्यावर कर लागू करण्यासाठी काय प्रयत्न झाले, याबाबत माहिती दिली. क्षेत्रफळावर आधारित शुल्काऐवजी शासनाच्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. महागड्या मालमत्तांच्या व्यवहारात यामुळे थेट लाखो रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. अनधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात तर तीनपट वाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे आता हे शुल्क १,५०० वरून ४,५००, तर ३,००० वरून ९,००० आणि ६,००० वरून १८,००० रुपये होणार आहे.

‘घोडबंदर’वर पेड पार्किंगचा प्रयोग

पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एनक्लेव्ह टीसीएस, निसर्ग तपोवन ते ऋतु इस्टेट, वाघबीळ जंक्शन ते भूमी एकर ब्रह्मांड फेज-८, ब्रह्मांड-पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग धोरण राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावालाही महासभेने मंजुरी दिली. या रस्त्यांवर सुमारे १,८०० पार्किंग लॉट उभारण्याचे नियोजन असून, दुचाकींसाठी ४६५, तीनचाकींसाठी १००, कारसाठी १,११५ आणि बस-ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी ८३ लॉट प्रस्तावित आहेत.

परिवहन सेवेच्या दरवाढीला ‘ब्रेक’

ठाणे परिवहनच्या दरवाढीचा प्रस्तावही महासभेत पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र, ‘एमएमआर’ क्षेत्रातील भाडेवाढ एकसमान असावी, या दृष्टीने सरकारकडून प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव तूर्तास मागे घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.