• Tue. Aug 18th, 2026

Rahul Narvekar : सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात खडाजंगी, राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात दिलेल्या निकालाच्या विरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याचा युक्तिवाद केला. त्यावर आता राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल हे आपल्या अशिलाची बाजू न्यायालयासमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे न्यायालयाचं मत नाही, असं स्पष्ट करत राहुल नार्वेकर यांनी आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा केला आहे.

राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

“कपिल सिब्बल हे आपल्या अशिलासाठी युक्तिवाद करत आहेत, हे स्वाभाविक आहे. त्यांना जी बाजू मांडायची आहे, ती ते मांडतील. परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे कोर्टाचं मत नाही. मी दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारे दिलेला आहे. त्या निकषांच्या आधारावर दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हा निर्णय टिकून राहील”, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

विधीमंडळ आणि राजकीय पक्षाच्या युक्तिवादावर काय म्हणाले?

शिवसेना पक्षातील विधिमंडळ पक्ष आणि सभागृहाबाहेरील राजकीय पक्ष यांच्यातील फरकावरही कपिल सिब्बल यांनी केलेल्या भाष्याबाबत नार्वेकर यांना विचारले असता, यावर त्यांनी हा विषय न्यायालयीन असल्याने त्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नसल्याचं सांगितलं. मात्र, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“सभागृहातील पक्ष आणि सभागृहाबाहेरील पक्ष म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यामधील फरक सर्वोच्च न्यायालयानेदेखील ओळखला आहे आणि त्यावर भाष्य केलं आहे. आम्हीही आमच्या निर्णयामध्ये हा फरक स्वीकारलेला आहे. पक्षाच्या आधारावर निर्णय का देण्यात आला, याची स्पष्टता त्या निर्णयामध्ये आहे”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Maharashtra TimesShiv Sena Hearing : मुख्य नेता हे पद पक्षाच्या संविधानात आहे का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

ट्रिपल टेस्टच्या आधारे निर्णय घेतल्याचा दावा

एकनाथ शिंदे गटाच्या नेतेपदासंदर्भातील निर्णयाबाबतही राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ‘ट्रिपल टेस्ट’चा आधार घेतल्याचं स्पष्ट केलं. संघटनेची रचना, घटनात्मक पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या तीन बाबींचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट फॉर्म्युला दिलेला आहे. त्या आधारावर जे योग्य आहे, तो निर्णय घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशनल पार्टी बघा आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी बघा, या सर्व बाबींची विचार करूनच हा निर्णय घेतला गेला आहे. असे नार्वेकर म्हणाले.

आपण घेतलेला निर्णय शाश्वत, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयीन असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्यास राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. मात्र, आपण दिलेला निर्णय कायदेशीर निकषांवर आधारित असून तो शाश्वत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाचा बचाव करत तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसारच असल्याचं ठामपणे स्पष्ट केलं आहे.