• Tue. Aug 18th, 2026

जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया… – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 18, 2026

महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘वॉक फॉर वॉटर’ ही केवळ एक वॉकेथॉन नसून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यापक लोकजागृती अभियानाचे प्रतीक आहे. पाण्याची उपलब्धता, त्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी आजपासूनच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज या माध्यमातून अधोरेखित केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

मृद व जलसंधारण विभागामार्फत स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण सप्ताह व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महावॉकेथॉन २०२६ आणि मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महावॉकेथॉन २०२६ मध्ये ३ कि.मी. चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाणी वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा हा संदेश देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये आणि गौरव चिन्ह तर तृतीय पुरस्कार १० हजार रुपये आणि गौरव चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी ३ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक परिस्थिती जिल्हानिहाय वेगळी आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य व्यवस्थापन, पाणी अडविणे, पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळी वाढविणे यासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन जीवनाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा भाग बनणे ही काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि नागरिकांचे जीवनमान यांना दीर्घकालीन आधार मिळू शकतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन ही भविष्यातील पिढ्यांसाठी जबाबदारीदेखील आहे.

जनजागृती अभियानाला आधुनिक माध्यमांची जोड देत युवा पिढीपर्यंत जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे संरक्षण यांसारख्या विषयांवर सर्जनशील पद्धतीने जनजागृती करावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. युवा पिढीची सर्जनशीलता आणि डिजिटल माध्यमांची पोहोच यांचा प्रभावी संगम या माध्यमातून साधला जाणार आहे.

मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धेच्या नियमानुसार पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदाची इन्स्टाग्राम रील्स करावी. व्हीडिओ रिलच्या सुरूवातीला रीलचा उद्देश, स्वत:चे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. रील्स स्वत:च्या पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करावी. रील मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करावी. #Save Soil Save Water हे अधिकृत हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. रील्स बनविण्यासाठी १. माती संवर्धन, मातीची धूप रोखणे २. पाणी बचत आणि जलसंधारण ३. पावसाच्या पाण्याचे संकलन ४. शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास ५. वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण ६. गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे ७. पारंपारिक मृद व जलसंधारण पद्धती ८. माती व पाणी वाचवण्याच्या नावीन्यपूर्ण कल्पना ९. आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य असे विषय देण्यात आले आहे. उत्कृष्ट रील्सना २५ हजार रुपयांचा प्रथम १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कारासोबत गौरवचिन्ह ही देण्यात येणार आहे. 

‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या अधिकृत क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना आपला सहभाग नोंदविता येणार आहे. त्यामुळे केवळ वॉकेथॉनमध्ये सहभागी होणे एवढ्यापुरतेच हे अभियान मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या कुटुंबात, परिसरात, गावात आणि समाजात जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. लोकसहभागातून निर्माण झालेली जनजागृतीच जलसंधारणाच्या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि परिणामकारक बनणार आहे.

जलसंधारणाच्या या राज्यव्यापी मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासन आणि नागरिक यांच्यातील सहभागाचे नवे पर्व सुरू होत आहे. पाण्याचा प्रश्न केवळ शासकीय योजनांमधून सुटणार नाही, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात सामील होऊन जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येत जलसंधारणाचा संदेश देणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी व्हावे आणि जलदूत बनून पाण्याच्या संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवावा. चला, एकत्र येऊया, पाण्यासाठी चालूया आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया…

 

वर्षा फडके – आंधळे

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed