• Sun. Aug 16th, 2026

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 29 ऑगस्टला आंदोलनाला बसणार, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुंबईत आंदोलन करणार का? याबाबत सूचक वक्तव्य केलं.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. अंतरवाली सराटी येथे आज मराठा अभ्यासकांची बैठक घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकारने केलेली चूक तात्काळ दुरुस्त करण्याचा इशारा दिला. सरकारने रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी करत, सरकारने चूक दुरुस्त केली तर आपले संबंध पूर्वीप्रमाणेच चांगले राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मराठा अभ्यासकांकडून राज्यातील तळागाळातील आरक्षणासंदर्भातील परिस्थितीची माहिती जरांगे पाटील यांनी जाणून घेतली. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या हरकती, प्रमाणपत्रांचे प्रश्न आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणी याबाबतही त्यांनी मराठा अभ्यासाकांकडून माहिती घेतली.

प्रमाणपत्रे कुणाच्या इशाऱ्यावर रद्द करत आहेत? जरांगेंचा सवाल

यावेळी जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही सवाल उपस्थित केले. सरकारने गॅझेटनुसार प्रमाणपत्रे दिली आणि त्यानंतर तीच प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असेल, तर त्यामागचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ही प्रमाणपत्रे कोणाच्या इशाऱ्यावर रद्द केली जात आहेत? असा सवालही त्यांनी केला.

जरांगेंनी गरीब विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मला राजकारणाशी काही देणे-घेणे नाही, मात्र गरीब मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

बावनकुळे यांच्या चर्चा केल्याचा दावा

यावेळी त्यांनी आमदार प्रसाद लाड यांनी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचा दावा केला. प्रमाणपत्रे सरसकट रद्द करू नयेत, असा सल्ला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, राज्यातील काही ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जे नेते यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत होते, तेच आता त्यांच्या कार्यालयात कसे येत आहेत? असा सवाल त्यांनी केला.

जरांगेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारकडून झालेली चूक तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा मराठा समाजाच्या हितासाठी पुढील भूमिका घेतली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जोपर्यंत सहन करायचे आहे तोपर्यंत सहन करू, मात्र त्यानंतर सरकारला आपली जागा दाखवू, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जरांगेंचा पुन्हा मुंबईत आंदोलनाचा इशारा?

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील मराठा समाज बांधवांना तयारीत राहण्याचे आवाहन केले. आपण आपली बाजू घेऊन कुठेही निघू, असे सांगत त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचे सूचक संकेत दिले. तसेच आपल्यालाही एसी बंगल्यांची हवा खायची आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशाराही दिला.

त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या भूमिकेत कोणता बदल करतात, तसेच जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या संकेतांवर प्रशासन काय तयारी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आजच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा