• Sat. Aug 15th, 2026

 ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

मुंबई, दि. १५ : भारत देश ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या शाश्वत तत्त्वावर विश्वास ठेवतो. प्रगतीच्या या वाटचालीत स्वतःच्या समृद्धीबरोबरच जगात शांतता राखण्याची, प्रगती आणि कल्याण करण्याची भारताची भूमिका आहे. या ऐतिहासिक प्रसंगी एका मजबूत, विकसित आणि जागतिक स्तरावर सन्मानित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी आत्मविश्वासाने आणि एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकाऱ्यांनी भारताचे स्वातंत्र्य, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा जयघोष केला.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या राष्ट्राची समृद्धी आणि कल्याणासाठी आपल्या सामूहिक जबाबदारीची आठवण हा दिवस करून देतो. आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून खंबीरपणे उभा आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत भारताला पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले उद्दिष्ट आहे. भारताने जगातील इतर राष्ट्रांसोबत जोडलेले सहकार्य आणि मैत्रीचे संबंध यामुळे आपली वाटचाल अधिक मजबूत झाली असल्याचे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.


या सोहळ्यास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे पदाधिकारी तसेच श्रीलंका, इंडोनेशिया, ब्राझील, जपान, चीन यांसह अनेक देशांचे राजदूत आणि कॉन्सुलर प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed