• Thu. Aug 13th, 2026

    Sukhbir Singh Badal: नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला; दर्शनावरून परतत असताना हातावर वार, हल्लेखोर ताब्यात

    Nanded Attack News: सुरक्षेसाठी या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं.

    नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला(फोटो– Lipi)
    नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आला आहे. मातासाहिब गुरुद्वारामध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून गुरुद्वारा दर्शन करून खाली येत असताना पायऱ्यांवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने बादल यांच्या हातावर वार केला. यावेळी झालेल्या गोंधळानंतर संशयिताने अन्य एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला. या घटनेत सुखवीरसिंग बादल यांच्यासह पोलीस अधिकारी जखमी झाले असून नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंग बादल पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे प्रमुख आहेत. बुधवारी ते खासदार पत्नी हरसीमनकौर बादल आणि कुटुंबातील सदस्यासह सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडला तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. गुरुद्वारामध्ये बादल कुटुंबीयाकडून पाठ ठेवण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी २ वाजेच्या सुमारास सुखबीरसिंग बादल हे आपल्या कुटुंबियासह नांदेड शहरापासून जवळ असलेल्या माता साहेब गुरुद्वारा दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

    दर्शन करून खाली उतरत असताना पायरीवर एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या जवळ आला. साधारण: ६० वर्ष वय असणारा हा व्यक्ती आपल्याशी आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, असं वाटल्याने सुखबीरसिंग बादल तिथे थांबले. मात्र सदर व्यक्तीने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खंजरने होणारा हा हल्ला रोखताना बादल यांच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. बादल यांच्यावरील हल्ल्यानंतर हल्लेखोराने सुरक्षा दलातील पोलीस निरीक्षकावर देखील हल्ला केल्याची माहिती आहे.

    दरम्यान, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. वृद्ध व्यक्तीने बादल यांच्यावर हल्ला का केला, या हल्ल्यामागील कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्यानंतर सुखबीरसिंग बदल यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.