• Tue. Aug 11th, 2026

    ‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्याचा गौरव आणि देशभक्तीचा जागर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 10, 2026

    मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता श्रीमती भुरीबेन लक्ष्मीचंद गोलवाला सभागृह, कामा लेन, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश असून, देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    भारताचा स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाची कृतज्ञतेने आठवण करून देत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. ‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत, संगीत आणि नृत्याविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे योगदान, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना लाभणार आहे.

    या कार्यक्रमात भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स आणि एस. पी. एन. दोशी महाविद्यालय यांच्या कलाकारांकडून देशभक्तीपर गीत व नृत्यावर आधारित विशेष सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार आहे. विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि भारतीयत्वाचा प्रेरणादायी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रनायकांचे योगदान आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रभावनेचा जागर करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

    मुंबई व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिकप्रेमी आणि रसिकांनी या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed