• Tue. Aug 11th, 2026

    रोहा येथील ब्लड बँक नागरिकांसाठी खुली करण्यात यावी – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2026

    मुंबई, दि. ११ : श्रीवर्धन, तळा, म्हसळा आणि रोहा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. रोहा येथील ब्लड बँक तातडीने नागरिकांच्या सुविधांसाठी खुली करावी. श्रीवर्धन व म्हसळा येथे डम्पींग ग्राउंड उभारणीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. श्रीवर्धन, तळा, म्हसळा, रोहा तालुक्यातील विकासकामांचा आज मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, रोहा येथील ब्लड बँकेचे काम पूर्णत्वास आले असून ती नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, ब्लड बँकेसाठी आवश्यक स्वतंत्र डीपी तयार करावा,  तसेच ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    ब्लड बँक सुरू करण्यासाठी आवश्यक तपासणी, अन्न व औषध तपासणी, एफडीए तसेच केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित शासकीय विभागांच्या इन्स्पेक्शनसह सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता वेळेत करण्यात यावी, नागरिकांना रक्तसाठा व रक्तविषयक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

    यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ब्लड बँकेचे काम जवळपास पूर्ण झाले असून आवश्यक यंत्रसामग्री व इतर बाबींची पूर्तता करून ती लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्याबाबत माहिती दिली.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed