मुंबई, दि. १०: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘फाळणी : एक शोकांतिका’ या विशेष दीर्घांक नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8.00 वाजता छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगास विनामूल्य प्रवेश असून, प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध असतील. फाळणीच्या काळात अनेक नागरिकांना विस्थापन, सामाजिक अस्थिरता आणि विविध आव्हानांना सामोरे जावे लागले. या ऐतिहासिक कालखंडाचे स्मरण करताना त्यातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात येणार आहे.
‘फाळणी : एक शोकांतिका’ या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून फाळणीच्या काळातील सामाजिक आणि मानवी परिस्थितीचा प्रभावी रंगमंचीय आविष्कार सादर करण्यात येणार आहे. इतिहासातील या महत्त्वपूर्ण कालखंडाचा मागोवा घेताना मानवी मूल्ये, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रहिताचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. भूतकाळातील अनुभवांतून प्रेरणा घेत अधिक एकसंध, समताधिष्ठित आणि सुसंवादी समाजनिर्मितीचा संदेश या कलाकृतीतून देण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगाचे लेखन डॉ. प्रकाश झा यांनी केले असून, दिग्दर्शन प्रमोद शेलार यांचे आहे. प्रभावी अभिनय, आशयपूर्ण मांडणी आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून फाळणीच्या इतिहासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडण्यात येणार आहेत.
विभाजन विभीषिका स्मृतीदिनाच्या माध्यमातून इतिहासाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करणे हा या सांस्कृतिक उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. इतिहासातील घटनांमधून बोध घेत भविष्यात शांतता, ऐक्य आणि सौहार्दाची मूल्ये जपण्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.
मुंबई व परिसरातील नागरिक, नाट्यरसिक, विद्यार्थी, युवक आणि सांस्कृतिकप्रेमींनी या आशयपूर्ण नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ