मुंबई, दि. २९ : राज्यपालांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सोयी-सुविधांयुक्त अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे. या जागांच्या एकात्मिक विकास प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा व पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाकडील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री. देसाई बोलत होते. बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी सैनिक कल्याण (पुणे विभाग) संचालक, सातारा जिल्हाधिकारी, सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी, पंढरपूर देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे माजी सैनिक कल्याण अधिकारी सहभागी झाले होते.
माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या संकुलाच्या माध्यमातून वीरपत्नी, माजी सैनिकांच्या पत्नींनी स्थापन केलेल्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याद्वारे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. हा उपक्रम माजी सैनिकांच्या कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणारा राज्यातील पहिलाच एकात्मिक विकास प्रकल्प आहे. या विकास प्रकल्पामध्ये पर्यटन विकासाबरोबरच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागांमधील प्रभावी समन्वय आणि समयबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एकात्मिक विकास प्रकल्प राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी नवे मानदंड प्रस्थापित करणारा ठरेल, असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रशासकीय सेवा आणि एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधांनीयुक्त अद्ययावत संकुल उभारण्याच्या प्रस्तावाबाबतही मंत्री देसाई यांनी सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सातारा व पंढरपूर येथील संबंधित जागांची सद्यस्थिती, जागांची तपासणी, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि दोन्ही विभागांच्या जागांच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.
0000
धोंडिराम अर्जुन/स.सं.
