सोलापूर, दि. ११ : आंत्रोळी गावात देशभक्त स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृष्णा (भाऊ काका) भीमराव आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. शहाजी पवार, श्री. शशिकांत चव्हाण, महानगरपालिका गटनेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, रामभाऊ तडवळकर, जिल्हा परिषद सदस्य मंद्रूप सोनाली कडते, अध्यक्ष श्रीकांत येळेगावकर, मोहन अंत्रोळीकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डॉ. आंत्रोळीकर हे केवळ आपल्या गावचेच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान असून त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात झाली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

तत्कालीन काळात एमबीबीएस पदवीधर असलेले डॉ. आंत्रोळीकर उच्चशिक्षित व उच्च विचारांचे होते. सर्वसामान्य व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. असहकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्त्व आपल्या जिल्ह्याला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटतो. सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी कुर्बान हुसेन हे त्यांचे शिष्य होते, तर उर्वरित हुतात्मे त्यांचे मित्र होते. पुतळा उभारणीसाठी ज्या समितीने परिश्रम घेतले, त्या सर्वांचे कौतुक आहे.
डॉ. आंत्रोळीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व समजेल. ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी आज प्रथमच आपल्या गावात आलो. यावेळी प्राप्त झालेल्या निवेदनानुसार डॉ. आंत्रोळीकरांच्या स्मरणार्थ सर्व विकासकामे लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी दिले.
