• Fri. Jul 10th, 2026

    ‘ज्याचा विठ्ठल’ चित्र-संगीतमय कार्यक्रमातून साकारणार पांडुरंगाच्या वारीचे भक्तिमय विश्व – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026
    ‘ज्याचा विठ्ठल’ चित्र-संगीतमय कार्यक्रमातून साकारणार पांडुरंगाच्या वारीचे भक्तिमय विश्व – महासंवाद

    मुंबई, दि. १० :  सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘ज्याचा विठ्ठल’ या विशेष चित्र-संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात करण्यात आले आहे.

    पांडुरंगाच्या वारीतील भक्तिभाव, संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि चंद्रभागेच्या तीरावरील पावन वातावरणाचा कलात्मक अनुभव या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतवाङ्मयातील विचार आणि विठ्ठलभक्तीचे विविध पैलू चित्र, संगीत, निवेदन आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडले जाणार आहेत.

    या कार्यक्रमाचे लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांनी केले असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे. संगीत संयोजन जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर यांनी केले आहे. कार्यक्रमातील चित्ररचना प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी साकारली असून प्रकाशयोजना सुजय भडकमकर यांची आहे. साहित्य, संगीत, चित्रकला आणि रंगमंचीय अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

    कार्यक्रमात अंजली मराठे, गजानन परांजपे, अमित वझे, पार्थ उमराणी, केतन पवार, स्वप्नील भावे, ओंकार जोशी, शौनक कुलकर्णी आणि मधुराणी गोखले हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या सादरीकरणातून वारकरी परंपरेतील भक्ती, श्रद्धा, समता आणि मानवतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचणार आहे.

    हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच अभिजात कला, लोककला आणि संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

    या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून संगीतप्रेमी, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्यावेगळ्या चित्र-संगीतमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    000000

     

    संजय ओरके/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *