• Thu. Jul 9th, 2026

    Maharashtra Rain : ‘महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडणार’, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

    Maharashtra Rain : ‘महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडणार’, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

    राज्यातील अनेक भागांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पुढच्या 10 ते 12 दिवस पाऊस पडणार नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलेलं बघायला मिळालं. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला. मराठवाडा वगळता इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. पण आता पाऊस ओसरताना दिसत आहे. मुंबई, ठाण्यात आज काहीसं ऊन पडलेलं बघायला मिळालं. त्यामुळे आता परत कधी पाऊस येणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे.

    मुसळधार पावसानंतर आता राज्यात पावसाचा मोठा खंड पडणार आहे, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. 10 जुलै ते 20 जुलै या काळात पावसाचा मोठा खंड पडणार आहे. केवळ 15 ते 17 जुलै या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.

    पंजाबराव डख नेमकं काय म्हणाले?

    “मी म्हणालो होतो त्याप्रमाणे 9 जुलैला सूर्यदर्शन घडलं आहे. राज्यात उद्याचा दिवस केवळ विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल. नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. 11 जुलैला राज्यभरात पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण पट्ट्यातील घाट माथ्यावरुन पाऊस ओसरणार आहे. 11 जुसैपासून राज्यात ऊन पडणार आहे. हवामान कोरडं राहणार आहे”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

    राज्यात आता चांगला पाऊस कधी पडणार?

    “मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार आहे. राज्यात परत 15 ते 17 जुलैनंतर विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर राज्यात पुन्हा चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्याची वाट बघावी लागेल”, असा दावा पंजाबराव डख यांनी केला.

    “वातावरणात तयार झालेला कमी दाबाचे क्षेत्र आता गुजरात, तिथून मध्य प्रदेशात जाणार आहे. त्यानंतर पुढे ते उत्तर प्रदेशात जाईल आणि नेपाळच्या दिशेला स्थिरावेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

    दुष्काळ पडणार नाही

    “सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत की, परत पाऊस येणार नाही. पण शेतकऱ्यांनो घाबरु नका. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस येणार आहे. पाऊस बिल्कुल येणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा पाऊस येईल”, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं.

    “15 ते 16 दरम्यानही तुरळक पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करुन घ्यावीत. यावर्षी शेतकऱ्यांसाठी चांगलं साल राहणार आहे. भरपूर पाऊस पडणार आहे. पीकं चांगलं येणार आहेत”, असं डख म्हणाले.

    “जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या खाडीत पुन्हा एक चक्रीवादळ तयार होईल. आपल्या महाराष्ट्राला यावर्षी अर्ध्या राज्याला पूर्वेतून पाऊस पडणार आहे. तर मुंबई ते अहिल्यानगरपर्यंत अरबी समुद्रातून पाऊस येणार आहे. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी”, असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा